आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये 8 महिन्यांत 'स्वाइन फ्लू'चेे 36 बळी, असा टाळा स्वाइन फ्लू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात या वर्षी म्हणजे जानेवारी २०१७ पासून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांत झालेल्या स्वाइन फ्लूच्या निदानाची संख्या मोठी आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नियंत्रणासाठी लोकसहभाग हाच एकमेव उपाय उरला आहे. स्वाइन फ्लूचा प्रतिबंध नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. 
 
स्वाइन फ्लू हा आजार इन्फ्लूएंझा एच एन या विषाणूपासून होतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे खोकल्यामुळे उडणाऱ्या थेंबातून हा आजार हवेतून पसरतो. सर्वसाधारणपणे याचे स्वरूप सौम्य असते. त्याचे साधारणत: तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते. सौम्य ताप, तसेच खोकला, घशाला खवखव होत असेल, डोकेदुखी, जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असेल, तर स्वॅब अर्थात थुंकीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाची गरज नाही. 
 
या लक्षणांबरोबरच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ३८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा (गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती) स्वॅब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरी सल्ल्यानुसार ‘ऑसेल टॅमीविर’ गोळी सुरू करावी. घरात त्यांना इतर सदस्यांपासून दूर ठेवावे आणि अँटिबायोटिक्सचा (प्रतिजैवके) वापर करण्यात यावा. 
 
ही आहेत प्रमुख लक्षणे 
धापलागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर, काळी पडणे, मुलांमध्ये चीडचीड झोपाळूपणा वाढणे अशी लक्षणे आढळून आल्यास अशा रुग्णांच्या थुंकीचे नमुने तातडीने घेऊन संबंधितास रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे. त्यांना ‘ऑसेल टॅमीविर’ गोळीची मात्रा सुरू करावी. रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. 

तपासलेले रुग्ण 
नगर- ६,७६६, अकोले - २०१४, जामखेड - ५,३५७, कर्जत - ३,३४१, कोपरगाव - ३,७००, नेवासे - २६३५, पारनेर - ८,३१९, पाथर्डी - ६०४४, राहाता - २,८२९, राहुरी - २३६५, शेवगाव - ५,४४४, संगमनेर - ७४३९, श्रीगोंदे - ३६९१, श्रीरामपूर - २५२५, एकूण - ६२४६९. 
 
नियंत्रणासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरू 
- जिल्ह्यात स्वाइनफ्लू नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू आहेत. रुग्णाचे निदान झाल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींवरही तत्काळ उपचार केले जातात. आतापर्यंत रुग्ण आढळून आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा या आजारापासून बचाव करण्यात यश आले. या व्यतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही बैठक यापूर्वी घेतली आहे. आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. उपचारांनंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो. लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात तपासणी करावी.'' डॉ.संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 
गर्दीत जाणे टाळा 
प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी, तसेच घरी असताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, स्वाइन फ्लूची लक्षणे असतील, तर हस्तांदोलन करू नका, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. औषधांचा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावा, अर्धवट सोडू नये. बहुतांश स्वाइन फ्लूचे रुग्ण सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा रुग्णांची घरीच चांगली काळजी घेतली पाहिजे. 
 
लगेच डॉक्टरांकडे जा 
ताप असेल, कणकण असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार विनाविलंब सुरू करता येतील. स्वाइन फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. विशेषत: गरोदर माता, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे. या शिवाय जुनाट गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही ही लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. 
 
असा टाळा स्वाइन फ्लू 
हा आजार टाळण्यासाठी बाहेरून घरी आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा समावेश आहारात असावा. पुरेशी विश्रांती झोपही सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. घरात, बाहेर कोठेही असो, शिंकताना, खोकताना नाक तोंडावर रुमाल धरावा. 
 
रुग्णाने काय करावे 
रुग्णासाठी वेगळी खोली निश्चित करावी. स्वत:च्या नाकावर रुमाल बांधावा, घरात इतर कोणी अतिजोखमीचे व्यक्ती असतील, तर त्यांच्याजवळ जाणे टाळावे. वापरलेले टिश्यू पेपर किंवा मास्क इतरत्र टाकू नयेत. वापरलेले रुमाल गरम पाण्यात अर्धा तास भिजवून स्वच्छ धुवावेत. भरपूर विश्रांती घ्यावी. धुम्रपान टाळावे. दिवसातून दोनदा गरम पाण्यात मीठ-हळद टाकून गुळण्या कराव्यात. गरम पाण्यात निलगिरी तेल किंवा मेंथॉल टाकून वाफ घ्यावी. 
बातम्या आणखी आहेत...