आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृप्ती देसाईंची शिंगणापुरात स्टंटबाजी, पोलिसांनी ताब्यात घेऊन शिंगणापूरबाहेर सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिवारी दुपारी अचानक शिंगणापुरात दाखल होऊन चौथऱ्याखालून मूर्तीचे दर्शन घेतले. पण त्यांच्या सभोवती गोळा झालेले नागरिक पाहून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिंगणापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शिंगणापूरच्या बाहेर नेऊन सोडले. काही आठवड्यांपूर्वीच देसाई यांनी नगरमध्येही स्टंटबाजी करत शिंगणापुरात जाण्याचा आग्रह धरला होता. पण जिवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना शिंगणापुरात जाण्यापासून परावृत्त केले होते.

शनिवारी देसाई काही महिला व पुरुष कार्यकर्त्यांसोबत शिंगणापुरात दाखल झाल्या. त्यांनी इतर भाविकांप्रमाणे चौथऱ्याखालून दर्शन घेतले. नंतर बराच वेळ त्या चौथऱ्यासमोरच उभ्या होत्या. चौथऱ्याजवळ नुकत्याच प्रतिष्ठापना केलेल्या पादुकांचे त्यांनी दर्शन घेतले. नंतर तेथे उपस्थित असलेल्या सहायक निरीक्षक प्रशांत मंडले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या वेळी आम्हाला विश्वस्तांसोबत चर्चा का करू दिली नाही, असे त्या म्हणाल्या. तोपर्यंत त्यांच्यासभोवती गर्दी जमलेली पाहून त्यांनी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश द्या, अशी घोषणाबाजी सुरू केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना शिंगणापूर बाहेर नेऊन सोडले. मंडले यांनी महिला पोलिसांना देसाई यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांना शिंगणापूरबाहेर सोडण्यात आले.