आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त केलेल्या २२ टन तुरीचे गौडबंगाल कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मनमाडरस्त्यावर दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या तुरीचे गौडबंगाल कायम आहे. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी या तुरीची पाहणी केली आहे. ही तूर बाजार समितीतूनच खरेदी केल्याच्या माहितीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी भूमिका नाफेडच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या जप्त केलेल्या तुरीबद्दल संभ्रम कायम आहे.
 
व्यापाऱ्यांनी आधीच मातीमोल दराने खरेदी केलेली तूर विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे सहकाऱ्यांनी मनमाड रस्त्यावर छापा टाकून दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यात तब्बल ४२ टन तूर होती. ट्रकचालकांना याबाबत व्यवस्थित माहिती सांगता आल्याने दोन्ही वाहने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेऊन लावण्यात आली. 

पोलिसांनी तत्काळ नाफेडच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. नाफेडचे मार्केटिंग अधिकारी जी. एम. मगरे हे नगरमध्ये दाखल झाले. त्यांनी वाहनचालकांकडे चौकशी केली, तसेच तुरीच्या पावत्याही तपासल्या. ही तूर पाथर्डी बाजार समितीतून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आढळून आलेल्या पावत्यांमध्ये बरीच तफावत आहे. बाजार समितीतून निघाल्याच्या वेळी वाहनांचे क्रमांक वेगळे होते, तर पोलिसांनी पकडले त्यावेळी वाहनांचे क्रमांक वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. 

तूर खरेदी करुन ज्या ट्रान्सपोर्टमार्फत तिची वाहतूक केली जाणार होती, तिची भूमिकाही संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पाथर्डी तालुक्यातील एक व्यक्ती तूर तस्करीच्या रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यानेच तूर ट्रकसह चार दिवसांपूर्वी गायब केली होती. त्याची सविस्तर चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. 

पत्रकार परिषदेला अॅड. प्रताप ढाकणे, संचालक बाळासाहेब घुले, प्रभारी सचिव दिलीप काटे, विष्णू सातपुते, वैभव दहिफळे, माणिकराव लोंढे, बाबासाहेब केदार, संभाजी नेहूल, किरण शेटे आदी उपस्थित होते. तिसगाव उपकेंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्यात आली. ही तूर नाफेडच्या गोदामात जाणार होती. त्यानुसार ट्रक पुण्याच्या वखार महामंडळाकडे निघाले. मात्र, त्यातील दोन ट्रक अचानक गायब झाले. एका चालकाच्या नातेवाईकाने ट्रकचे अपहरण केले होते, असा आरोप त्यांनी केला.

खंडणीची मागणी 
अपहरण केलेले ट्रक सोडवण्यासाठी समितीच्या प्रशासनाकडे १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप संचालकांनी केला. मे रोजी बाजार समितीने बैठक घेऊन फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी संचालक मंडळाने केली आहे. 
नगर - मनमाड रस्त्यावर दोन मालमोटारीतील सुमारे ४२ टन तूर डाळ जप्त करण्यात आली आहे. 

अद्याप अहवाल नाही 
जप्ततुरीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. मार्केटिंग अधिकारी जी. एम. मगरे नगरला दाखल झाले. त्यांनी चौकशीदेखील केली. मात्र, त्यांचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. स्थानिक गुन्हे शाखेने वाहनांचा पंचनामा केला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच काय गुन्हा नोंदवायचा हे ठरेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

तो तस्कर कोण? 
बाजारसमितीच्या संचालक मंडळाने ट्रकचे अपहरण करण्यामागे पाथर्डीतील एकाचा हात असल्याचा आरोप केला. या व्यक्तीची पार्श्र्वभूमी चांगली नाही. यापूर्वीही त्याच्यावर भेसळीच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुरीसह इतर धान्याचीही तो तस्करी करत असल्याचे सांगितले जाते. काही पोलिसांशी त्याचे आर्थिक लागेबांधेही होते, अशीही वदंता सध्या आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...