आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीवर मुंबईत अखेर शिक्कामोर्तब, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बैठकाही होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीचा नारा सर्वच नेत्यांनी दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मुंबईत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. सद्यस्थितीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. या दोन्ही नावांच्या निवडीबाबत १८ मार्चला पुन्हा बैठक होणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून समजले. 
 
जिल्हा परिषदेत निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मागील अडीच वर्षांत राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला बरोबर घेतले होते. त्याची पुनरावृत्ती काँग्रेसकडून होण्याची चर्चा होती. परंतु आता सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडे असलेल्या २३ जागा राष्ट्रवादीच्या १८ जागा, हे गणित जुळवल्यास संख्याबळ ४१ वर पोहोचते. प्रत्यक्षात सत्ता स्थापनेसाठी ३७ संख्याबळाचीच गरज आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र एकत्र आल्यास सत्ता स्थापनेसाठी इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. यासंदर्भात पंधरा दिवसांपासून जोरदार चर्चा झडत होती.
 
 आघाडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यभरात आघाडी करण्याचे संकेत देऊन या चर्चेला बळकटी दिली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार दिलीप वळसे, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार जयंत ससाणे, बाबासाहेब दिघे आदी उपस्थित होते. 
 
बैठकीत दोन्ही काँग्रेसने आघाडी केल्यास बहुमत तयार होणार आहे. त्यामुळे अन्य कोणाला बरोबर घेण्याचा प्रश्नच नाही. जुन्या फाॅर्म्युल्याप्रमाणेच अध्यक्ष उपाध्यक्षपद ठरवले जाणार आहे. पण पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र बसून चर्चा करण्याचे ठरले आहे. पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्यानंतर नगरला १८ मार्चला एकत्र बसण्याचे नियोजन ठरले. या निर्णयामुळे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘दिव्य मराठी’ने २४ मार्चला काँग्रेसचा अध्यक्ष होणार असे वृत्त प्रकाशित केले होते. 
 
परंतु अध्यक्ष उपाध्यक्षपदाची नावे अजून ठरली नाहीत. नगरमध्ये होणाऱ्या बैठकीतच ही नावे निश्चित केली जाणार आहेत. आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाआघाडीसह इतर उमेदवारांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपद तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष लागले आहे. 
 
जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसने १८ मार्चला एकत्र बसण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी काँग्रेसला अध्यक्षपदाचा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षदाचा उमेदवार ठरवण्यासाठी अंतर्गत बैठका घ्याव्या लागणार आहेत. आठवडाभरातच अंतर्गत बैठका आटोपण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 
 
...तर राष्ट्रवादीकडे अर्थ बांधकाम 
सध्या काँग्रेसकडे उपाध्यक्षपद, अर्थ, बांधकाम समाजकल्याण समिती आहे. त्याच फॉर्म्युल्यानुसार सत्ता स्थापन करताना दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, बांधकाम समाजकल्याण समितीची अपेक्षा आहे. 
 
उपाध्यक्षपद उत्तरेला मिळण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा उमेदवार देताना उत्तरेतील एका सदस्याला संधी देणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. हा निर्णय भाजपच्या एका दिग्गजाला विधानसभेत शह देण्यासाठीच घेतला जाणार असल्याची माहिती समजली. 
बातम्या आणखी आहेत...