आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वराळ खूनप्रकरण: सहा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निघोजचे (ता. पारनेर) माजी उपसरपंच संदीप मच्छिंद्र वराळ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या सहा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांना पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. नागेश लोखंडे या आरोपीची पोलिस कोठडी फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार तथा कुख्यात वाळूतस्कर प्रवीण रसाळ मात्र अद्याप फरार आहे. 
 
२१ जानेवारीला निघोजमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून संदीप वराळ यांच्यावर गोळीबार करून, तसेच तलवारीने वार करून निर्घृण हत्या झाली. सलूनमध्ये दाढी करत असताना हा हल्ला झाला. संदीप यांचे चुलते रंगनाथ किसन वराळ यांच्या फिर्यादीवरून १९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवून जणांना ताब्यात घेतले. त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश हाेता. 

बबन ऊर्फ किसन पाटीलबा कवाद, महेंद्र लक्ष्मण झावरे, अमृता महादू रसाळ, संदीप रेवजी लंके, माउली ऊर्फ ज्ञानेश्वर आनंदा रसाळ, मुक्तार शादीर इनामदार त्यांची नावे होती. या आरोपींची पोलिस कोठडी शुक्रवारी संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या सहाही जणांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत झाली आहे. दोन दिवसांनी पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील पेण येथून नागेश लोखंडे यालाही पकडले होते. 

लोखंडेची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यालाही शुक्रवारी इतर आरोपींसोबत न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती तपासी अधिकारी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ती मान्य करत नागेशला फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे करत आहेत. 
 
प्रवीण रसाळ सापडेना 
वराळ हत्या प्रकरणात कुख्यात वाळूतस्कर प्रवीण रसाळ याचे नाव सुरुवातीलाच समोर आले आहे. रसाळ हा ‘मोक्का’च्या गुन्ह्यात कैदेत असताना संचित रजेवर तुरुंगाबाहेर आला होता. प्रवीणचा भाऊ विकी ऊर्फ विकास रसाळ यानेच सर्व प्रथम वराळ यांच्यावर गोळीबार केला. विकी रसाळच्या मुसक्याही पोलिसांनी उस्मानाबादमध्ये आवळल्या. आता पोलिस कुख्यात गुंड प्रवीण रसाळच्या मागावर आहेत. 
 
हत्यारे जप्त 
संदीप वराळ यांच्यावर विकी ऊर्फ विकास रसाळने पिस्तुलातून गोळीबार केला. नंतर इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या गुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही हत्यारे आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली होती. हत्याकांडानंतर आरोपीही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आले. वराळ यांची हत्या केल्यानंतर आरोपी परजिल्ह्यात पळून गेले होते. 
बातम्या आणखी आहेत...