आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी वात्रटीकांतून वर्षभर करणार जनजागृती, विविध कार्यक्रम होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - पुस्तकातदडून बसलेली कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पाेहोचवणारे, राजकीय मार्मिक भाष्य करणाऱ्या वात्रटिका लिहिणारे कवी, तसेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे येत्या १४ एप्रिलला ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्त वर्षभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या भागात जाऊन कवितांचे कार्यक्रम करून त्यांची मानसिकता बदलवण्याचे काम ते करणार आहेत. येत्या १४ पासूनच या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची फौज त्यांच्याबरोबर असेल. 
 
फुटाणे हे जामखेडचे. १९६१ ते १९७३ या काळात कलाशिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. कटपीस या हिंदी कवितासंग्रहानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे त्यांचे मराठी कवितासंग्रह गाजले. ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले, तशी रसिकांची दादही मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी कवितासंग्रह प्रसिध्द झाले. 
 
कविता, वात्रटीका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच फुटाणे यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कला त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडली. पाना-फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंगांवरील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा रसिकवर्ग निर्माण झाला. 
 
१९७५ मध्ये निर्मिती केलेला ‘सामना’ प्रचंड गाजला. सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षीची बंगळुरू इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली. फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा
वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. 
 
पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्त वर्षभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या भागात जाऊन कवितांचे कार्यक्रम करून मानसिकता बदलवण्याचे काम ते करणार आहेत. येत्या १४ पासूनच या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची फौज त्यांच्याबरोबर असेल. आत्महत्या घडून गेल्यानंतर चित्रपट किंवा कविता लिहिण्यापेक्षा शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठीची जनजागृती कवितांमधून ते करणार आहेत. 
 
सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत १३ ला सोहळा 
‘नानां’च्याअमृतमहोत्सवाची सुरुवात खास पुणेरी थाटात केली जाणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांची निर्मिती असलेला ‘सामना’ चित्रपट रसिकांना दाखवण्यात येईल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे शाखा महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या संयक्त विद्यमाने पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काइव्ज सभागृहात १३ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रकाश मगदृम, भरत देसडला अरुण शेवते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...