आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईंकडे जे मागितले ते मला व जनतेला मिळाले : वसुंधरा राजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबांच्या शिर्डीशी आपले खूप वर्षांपासूनचे नाते आहे. पूर्वीची शिर्डी आणि आजच्या शिर्डीत खूप मोठा बदल झालेला अाहे, हा साईबाबांच्याच शक्तीचा साक्षात्कार आहे. आजवर मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबीयांसाठी व माझ्या जनतेसाठी साईंकडे जे काही मागितले ते सर्व बाबांनी मला दिले आहे, अशी भावना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी व्यक्त केली.   


राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सोमवारी दुपारी दोन वाजता शिर्डीत दाखल झाल्या. त्यांचे साई संस्थानच्या वतीने प्रभारी कार्यकारी अधिकारी धनंजय निकम व संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांची पाद्यपूजा करून दर्शन घेतले. साई समाधी दर्शनानंतर गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेऊन त्या द्वारकामाईत गेल्या. तेथील दर्शनानंतर साई मंदिराची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी संवादही साधला. मी आज बऱ्याच दिवसांनंतर शिर्डीला आले आहे. त्यामुळे राजकीय काही बोलणार नाही. शिर्डीत आल्यावर मंदिर परिसरात झालेला बदल पाहून मला अतिशय समाधान वाटले. पूर्वी छोटेसे असणाऱ्या शिर्डी गावाचे रूपांतर मोठ्या शहरात झाले आहे. साईसमाधी मंदिर व गुरुस्थानजवळ छोटसे लिंबाचे वृक्ष होते. आज बऱ्याच वर्षांनंतर येथे आल्यावर येथील मंदिर परिसरात झालेला बदल पाहून अतिशय समाधान वाटले. साईंचा महिमा अफाट आहे. शिर्डीला आलेल्या भाविकांची साईबाबा इच्छा पूर्ण करतात,  असेही त्या म्हणाल्या.

 

त्र्यंबकनगरीतही दर्शन
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे त्र्यंबकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी सायंकाळी आगमन झाले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे  यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, व्यवस्थापक वैद्य, राजाभाऊ जोशी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात त्यांनी अभिषेक पूजा केली. यावेळी पौरोहित्य गिरीश जोशी, डाॅ. दिलीप जोशी यांनी केले. भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, त्र्यंबकेश्वर भाजपचे शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...