आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : श्रीकृष्णनगरमध्ये पावसाचे पाणी शिरले घरात, परिसरातील नागरिक कॉलनीतच बसणार उपोषणाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-कल्याण रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. (छायाचित्रे : मंदार साबळे) - Divya Marathi
नगर-कल्याण रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. (छायाचित्रे : मंदार साबळे)
नगर - नगर-कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर भागातील श्रीकृष्णनगरमध्ये पावसाचे ड्रेनेजचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आहे. घराचा परिसर, मोकळी मैदाने, तसेच मंदिरे गेल्या तीन-चार दिवसांपासून पाण्यात आहेत. महापालिकेचे अधिकारी स्थानिक नगरसेवक अद्याप या भागात फिरकलेले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिक आता आपल्या कॉलनीतच उपोषणाला बसणार आहेत. 

शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उभ्या राहिल्या आहेत. परंतु या भागातील समस्यांकडे आतापर्यंत कोणीच लक्ष दिलेले नाही. परिणामी येथील समस्या सुटण्याऐवजी त्या अधिक वाढल्या आहेत. दरवर्षी साचणारे पावसाचे पाणी ही या भागातील सर्वात मोठी समस्या आहे. स्थानिक नगरसेवक अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार अर्ज देऊन, वेळप्रसंगी आंदोलने करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. या भागात काळ्या मातीचे प्रमाण अधिक अाहे, त्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे या भागात प्रत्येक पावसाळ्यात जागाेजागी पाण्याची तळी निर्माण होतात. यंदा तर पहिल्या एक-दोन पावसातच नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यात अनेक लहान-मोठ्या घरांचा समावेश आहे. घराचा परिसर, मोकळी मैदाने, तसेच मंदिरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून हे पाणी साचले आहे. घरात साचलेले पाणी बाहेर उपसून टाकण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला कसरत करावी लागत आहे. कोणी बादल्यांनी, तर काही चक्क विद्युत मोटारी लावून घरातील पाणी उपसत आहे. संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात आयुक्त दिलीप गावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु त्यांच्या पदरी आश्वासनांशिवाय दुसरे काहीच पडले नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आता महापालिकेच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सुरुवातीला आपल्या कॉलनीतच उपोषण करून ते महापालिकेचा निषेध नोंदवणार आहेत. तरीदेखील प्रश्न सुटला नाही, तर नगर -कल्याण महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिल्या. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ड्रेनेजलाइनचे काम पडले मध्येच बंद आणि पाहा फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...