आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेबाजांची राजकीय मैफल चार कुटुंबांच्या मुळावर, मागे उरली चिलीपिली अन् दिव्यांग पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांगरमल- राजकीय आेढाताणीत मतांची तुंबडी भरू पाहणाऱ्या राजकीय नशेेबाजांच्या मैफलीत मद्यधुंद झालेल्या चारजणांचा बळी गेला. तो उमेदवार कोणत्या पक्षाचा हा प्रश्न गौण आहे, पण ही जी ‘संस्कृती’ नगर जिल्ह्यात फोफावत आहे, ती धोकादायक आहे. या संस्कृतीचेच हे चार बळी ठरले. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांची कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. एकाच्या मागे तर दिव्यांग पत्नी दोन लहान मुले आहेत. त्यांच्याबरोबर या सर्वांच्याच कुटुंबीयांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी गावात भेट दिली असता सर्वांच्या चेहऱ्यावर शोककळा दाटलेली होती. 

ही घटना नगर शहरापासून तीस-पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरमल येथे घडली. मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांचा कणाच या दुर्घटनेत मोडला. निवडणूक कोणतीही असली, तरी तिखट पार्टीला मद्याची जोड अशी प्रथाच रूढ झाली आहे. विजयी होण्याचे ध्येय ठेवून आवश्यक त्या सगळ्या पातळ्या ओलांडण्याची स्पर्धाच उमेदवारांमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत भरडला जातो तो हातावर पोट घेऊन जगणारा गरीब. पांगरमल गाव जिल्हा परिषदेच्या जेऊर गटात आहे. गावात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला मोडकळीस आलेले बसस्थानक, तेथेच काळपट पडलेल्या जुनाट लाकडी दोन-तीन टपऱ्या दिसतात. जवळच असलेल्या वडाच्या पाराखाली बसलेले चिंताग्रस्त ज्येष्ठ ग्रामस्थ दिसत होते. गावाच्याच काय, पण पंचक्रोशीच्या इतिहासात अशी घटना झाली नसल्याचे ते खिन्न स्वरात सांगतात. 

मोडकळीस आलेल्या घरांच्या ओट्यावर याच घटनेची कुजबुजत चर्चा करणारे तरुण ग्रामस्थ पहायला मिळाले. गावात प्रवेश करतानाच साधारणत: पन्नाशी ओलांडलेली महिला पाणावलेल्या डोळ्याने ‘दिव्य मराठी’ टीमच्या दिशेने येत म्हणाली, ‘सारेच अवघड झाले, लहान लेकरं उघड्यावर पडली. आता काय करायचं?’ दाटलेल्या कंठातून शब्दांना वाट देत ती निशब्द झाली. 
ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर मद्यप्राशनामुळे मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबाची विदारक अवस्था ग्रामस्थांनी मांडली. 

त्यांच्यामागे उरली चिलीपीली अन् अर्धांगिनी
मद्यप्राशनामुळे पोपट दिलीप रंगनाथ आव्हाड हे सख्खे भाऊ, राजेंद्र खंडू आंधळे, प्रभाकर शिवाजी पेटारे यांचा बळी गेला. बसस्थानकापासून डाव्या बाजूला शंभर मीटर अंतरावर आंधळे यांचे घर आहे. घराला प्लास्टर नाही, रंगरंगोटीही नाही. ओट्यावर डबडबलेल्या डोळ्यातील अश्रुंना पापण्यांच्या झापाआडच थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करणाऱ्या महिला शांतपणे बसल्या होत्या. आतून अस्पष्ट हुंदक्यांचा आवाज येत होता. दारूच्या क्षुल्लक कारणाने आंधळे हे जग सोडून गेले. त्यांच्यामागे त्यांची दिव्यांग पत्नी, अजय हा पाचवीतील मुलगा अन् दुसरी इयत्तेतील भक्ती ही मुलगी उरली. या निष्पाप जीवांना बाप गेल्याच्या दु:खाची अजून जाणही आलेली नव्हती. त्यांच्या निरागस चेहऱ्यांकडे पाहून उपस्थितांचेही काळिज हेलावले. 

या सर्वांकडेच जेमतेम एकरभर काहींकडे त्याहूनही कमी जिरायती शेती आहे. त्यात पेरलेले निम्मे उगवतही नाही. अशा स्थितीमुळे मोलमजुरी हेच उदरनिर्वाहाचे साधन होते. प्रचारामुळे मजुरीइतकी रक्कम सहज मिळत होती. त्याच्याबरोबर दारू जेवणही मिळायचे. त्या मोहात त्यांना प्राण गमवावे लागले. 

निवडणुकांच्या रणधुमाळीत दारूबंदीवर प्रशासनाचे लक्ष आहे. पण नेमकी याच गावात अशी विषारी दारू पोहोचली कशी, हा प्रश्न उपस्थित झाला. नोटबंदीचे धाडस दाखवणारे सरकार सक्तीच्या दारूबंदीचे धोरण घेणार का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. जर-तरच्या तर्कवितर्कांत ही पाच कुटुंबे नक्कीच वाचली असते, यात शंका नाही. पांगरमल गावातही दारूबंदी करण्याचा सूर अाळवला जात आहे. 

येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या केशव शिंगवे गावातील बँडपथकात काम करणारे मूळचे नगरचे प्रभाकर पेटारे यांनाही याच घटनेत जीव गमवावा लागला. त्यांना तीन मुली, एक मुलगा आहे. थोरली मुलगी लग्नाची आहे. 

गावातही बेकायदा विकली जाते दारू 
गावात दारूचे अधिकृत विक्री केंद्र नाही, पण पांगरमलपासून एक-दोन किलोमीटरवर बेकायदेशीर दारुविक्री केली जाते, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर दारूवर बंदी आणायला हवी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.  
 
पुढील स्लाईडवर वाचा...
- त्या दुकानांत विषारी दारु कशी आली..?
- सरकारने पाच लाखांची मदत द्यावी, दलित महासंघाची निदर्शने 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...