आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मृत महिलेचे गुजरात कनेक्शन? नगरच्या बायपास रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कल्याण रोडवरील बायपास रस्त्यालगत एका २५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. आधी खून करुन, चेहरा विद्रूप करून पेट्रोल टाकून महिलेला जाळल्याचा पोलिसांचा संशय आहे. हा प्रकार सकाळी ९ वाजता उजेडात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे गुजरात कनेक्शन असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, त्यासह इतर सर्व शक्यता पोलिस पडताळून पहात आहेत.

पारनेर तालुका पंचायत समितीचे कर्मचारी राहुल भिकाजी अौटी (२६, रा. नेप्ती फाटा, भैरवनाथ वस्ती, नगर) हे बायपास रस्त्याने जात असताना त्यांनी नालेगाव शिवारात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहिला. त्यांनी ताबडतोब तोफखाना पोलिस ठाण्यात फोन करुन खबर दिली. घटनेची माहिती मिळताच तोफखान्याचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, फौजदार विकास काळे, पोलिस कॉन्स्टेबल राम सोनवणे, घटनास्थळी रवाना झाले. काही वेळाने पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक धनश्याम पाटील, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
 
बायपास रोडला रस्ताचे कडेला रेल्वे पुलाजवळ एक अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला होता. तिचे अंदाजे वय २५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता व सलवार परिधान केलेली होती. मृतदेहाशेजारी पाण्याची बाटली व एक काडेपेटी मिळून आली. या बाटलीला पेट्रोलचा वास येत होता. मृतदेहाचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून विद्रुप केलेला होता. तसेच गळ्यावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या.
पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात रवाना
केला.
 
महिलेचा आधी खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत तिची ओळख पटलेली नव्हती. पोलिसंाकडून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये मिळतेजुळते वर्णन असलेल्या महिलांच्या मिसिंग तक्रारींची शहानिशा केली जात आहे. याशिवाय कोणाला अधिक माहिती असल्यास तोफखाना पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विकास काळे हे करीत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...