आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचारशे शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा, ज्येष्ठता यादीवरून शिक्षकांमध्ये संभ्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर- आंतरजिल्हाबदलीने जिल्ह्यात हजर झालेल्या सुमारे साडेचारशे शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा अाहे. मंगळवारी (१८ जुलै) या शिक्षकांना नियुक्ती द्यायची आहे, परंतु नियुक्ती देताना प्राधान्यक्रम कसा असावा, याबाबत या शिक्षकांमध्येच आता दोन गट पडले आहेत. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावत नियमानुसारच नियुक्त्या दिल्या जातील असे स्पष्ट केले.
 
इतर जिल्ह्यांतून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी ना-हरकत दिलेल्या २०७ पैकी १०५ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याने राज्यस्तरावरून ऑनलाइन अर्ज करणाऱ्या सुमारे साडेचारशे शिक्षकांना नगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचे आदेश सरकारने दिले होते. हे शिक्षक दहा ते पंधरा दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेत हजर झाले. पण त्यांना नियुक्त्या मिळू शकलेल्या नाहीत.

या शिक्षकांना मंगळवारी (१८ जुलै) नियुक्त्या देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर आटोपण्यात आले आहे. रिक्त जागांवर नियुक्त्या देताना प्राधान्यक्रम कसा असावा याबाबत मात्र संभ्रम आहे. प्रशासनाने प्राधान्यक्रम शासनाच्या धोरणानुसारच ठरवला आहे. विधवा, परित्यक्त्या, पती-पत्नी एकत्रिकरण आदी संवर्गाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित शिक्षकांना नियुक्त्या दिल्या जातील.

शिक्षकांचे जिल्ह्यात आल्यानंतर दोन गट पडले आहेत. या शिक्षकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांची सोमवारी भेट घेतली. प्राधान्यक्रमात पती-पत्नी एकत्रिकरण घेऊ नये, अशी मागणी केली. एका गटाने हजर दिवसापासून प्राधान्य ठरवण्याची मागणी करत आहे. यासंदर्भात डॉ. कोल्हे यांनी शिक्षकांना खडे बोल सुनावले.

डॉ. कोल्हे म्हणाले, पती-पत्नी एकत्रिकरण हे प्राधान्यक्रमात आहे का? त्यावर शिक्षक हो म्हणाले. त्यावर कोल्हे यांनी नियमानुसारच बदल्या होतील. तुम्हाला नियुक्त्या स्वीकारायच्या असतील, तर स्वीकारा; अन्यथा तुम्ही परत जाऊ शकता, असे सुनावले.
 
गोंधळ होण्याची धास्ती
शिक्षकांचीसंख्या साडेचारशे असून या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकांमध्येच दोन गट पडल्याने प्रशासनासमोर नियमानुसार नियुक्त्या देण्याचा पेच आहे. या कालावधीत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.