आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नोटरी’वर गुपचूप सह्या करा, नाहीतर तुम्हाला संपवून टाकीन; ‘मावळा’चा अध्यक्ष नीलेश म्हसेची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलेश म्हसे - Divya Marathi
नीलेश म्हसे
नगर - बोगस मजकूर असलेल्या नोटरीवर सह्या करण्यासाठी मावळा संघटनेचा अध्यक्ष नीलेश सत्यवान म्हसे (रा. इरिगेशन कॉलनी, औरंगाबाद रस्ता) याने सहआरोपींना धमकावले. त्यांनी सह्या करण्यास नकार दिला असता २० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. गुपचूप सह्या करा, नाहीतर संपवून टाकेन, अशा भाषेत म्हसेने सहआरोपींना धमकावले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी अजमुद्दीन गुलाब सय्यद याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी म्हसेविरुद्ध खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. 
 
एमआयडीसी पोलिसांनी नागापूर, चेतना कॉलनी परिसरात छापे टाकून जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अजमुद्दीन सय्यद, भाऊसाहेब रमाचंद्र वरुटे (४७, रा. वडगाव गुप्ता), कय्युम अकबर सय्यद (२५, रा. गजानन कॉलनी), जितेंद्र पाटोळे (नवनागापूर) नीलेश म्हसे (रा. नगर) यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. शनिवारी सायंकाळी जितेंद्र पाटोळेने अजमुद्दीनला गजानन कॉलनी चौकात बाेलावून घेतले. तेथे पाटोळे, महेंद्र कदम, भाऊसाहेब वरुटे नीलेश म्हसे आधीपासूनच उपस्थित होते. 
 
नीलेश म्हसेने अजमुद्दीनला सायंकाळी मी बोलवेन तेथे ये, नाहीतर संपवून टाकीन अशी धमकी दिली. सायंकाळी अजमुद्दीन, कय्युम सय्यद, महेंद्र कदम, भाऊसाहेब वरुटे यांना घेऊन पाटोळे नीलेश म्हसे याला भेटायला माणिक चौकात गेले. तेथे नीलेश म्हसेने त्याच्याकडील स्टॅम्पपेपर दाखवून त्यावर सह्या करायला सांगितले. अजमुद्दीनने ते वाचले असता त्यात एमआयडीसी पोलिसांनी केलेली कारवाई खोटी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अजमुद्दीन, कय्युम, कदम वरुटे यांनी त्यावर सह्या करायला नकार दिला. नीलेश म्हसेने त्यांच्याकडे स्टॅम्पपेपरचे २० हजार रुपये द्या, अशी मागणी केली. 
 
नीलेश म्हसेने स्टँपपेपरवर जितेंद्र पाटोळेच्या सह्या अंगठे घेतले. इतरांना सह्या करण्यासाठी धमकावत असताना त्यांचे नीलेश म्हसेचे वाद झाले. त्यावेळी म्हसेच्या अनोळखी साथीदारांनीही सर्वांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. अजमुद्दीनने स्टॅम्पपेपरचा फोटाे काढण्याचा प्रयत्न केला असता नीलेश म्हसेने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटोळे वगळता इतर सर्वजण पळून गेले. नंतर सर्वांनी थेट एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून रितसर फिर्याद नोंदवली. खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बनावट नोटरी तयार करणे, खोटे पुरावे तयार करणे या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
पोलिसांना खोटे ठरवण्यासाठी नोटरीचा उपद्व्याप 
मटकाबुकी जितेंद्र पाटोळे नीलेश म्हसे भागीदारीमध्ये अवैध मटका धंदा करतात. मी पोलिसांना पैसे देतो, जेणेकरुन ते छापे टाकणार नाहीत, असे सांगून म्हसे दरमहा मटका धंदेवाल्यांकडून परस्पर हप्ते गोळा करायचा, असे पाटोळे यानेच पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी नीलेश म्हसे यालाही आरोपी केले होते. मात्र, पोलिसांनी दमबाजी करुन बळजबरीने गुन्ह्यात नाव अडकवल्याचे लिहून द्या, असे म्हणत म्हसे याने नोटरी तयार करुन घेतली. नोटरीवर सह्या करवून घेताना म्हसे याने सहआरोपींना २० हजार रुपयांची खंडणी मागितली. 
बातम्या आणखी आहेत...