आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जलयुक्त शिवार'च्या पाण्याचे योग्य नियोजन हवे : पालकमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात पाण्याचे विकेंद्रीत साठे निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, या पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व्हायला हवे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणी साठे वाढले, भूजलाची पातळी वाढली. मात्र, या पाण्याच्या वापराचे योग्य पध्दतीने नियोजन केले पाहिजे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन ठिबक पध्दतीने पाणी वापर पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. ज्या गावांना पुरस्कार मिळाले, त्यांनी भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्रचा पहिला पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते कर्जतला देण्यात आला. गुंडेगावला द्वितीय, तर पळवे बुद्रूकला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. कुमशेतला चौथा, तर चिखलीला पाचव्या क्रमाकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानात सहभागी झाल्याबद्दल घाटशिरस, तांदळी वडगाव, उक्कलगाव, मांडवगण, कांबी, आडगाव, खंदरमाळवाडी, कऱ्हे, लेहेनेवाडी, आरणगाव, मोहा आणि राजुरी या गावांचा यावेळी गौरवण्यात आले. या अभियानात उकृष्ट काम करणारे मंडल कृषी अधिकारी अमृत भाऊसाहेब गांगर्डे सुंदरदास बिरंगळ यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी पोपटराव पवार मंजूषा गुंड यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले, तर आभार बाळासाहेब नितनवरे यांनी मानले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना कर्जत येथील ग्रामस्थ.

बातम्या आणखी आहेत...