आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NGO Federation Suspended Hunger Strike In The City

नगरमध्‍ये स्वयंसेवी महासंघाचे उपोषण स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बालगृहातील अनाथ मुलांच्या भविष्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशी स्वयंसेवी संस्था महासंघाने एक महिन्यासाठी उपोषण स्थगित केले. दरम्यान, महिला व बालविकास विभागातील गैरप्रकारांची येत्या सात दिवसांत चौकशी करून हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार असल्याचे चौकशी अधिकारी राहुल मोरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

महिला व बालकल्याण विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधातील उपोषणात बाबुराव महाराज गिरी, डॉ. अरुण इथापे, किशोर डोके, रावसाहेब लामखडे, स्नेहालयचे मिलिंद कुलकर्णी सहभागी झाले होते. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, अनंत देसाई व मुन्ना चमडेवाला यांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता.

सोमवारी रात्री महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी उपोषणकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सातजणांची समिती नियुक्त करण्यात आली असून, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री थोरात यांनी मंगळवारी महासंघाचे संघटक डॉ. गिरीश कुलकर्णी, विनायक आव्हाड, रावसाहेब झावरे, हनिफ शेख, सरोज चांदेकर, अँड. श्याम आसावा यांना संगमनेर येथे चर्चेसाठी बोलावून घेतले. नंतर थोरात यांनी महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून आंदोलनाची कल्पना दिली. महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर पगारे यांच्यावरील गंभीर आरोपांबाबत शासनस्तरावर तातडीने कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली. महसूलमंत्र्यांच्या वतीने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सारडा यांनी कार्यकर्त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. लिंबूपाणी घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.