आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ गावांनी दुष्काळाशी केलेला सामना पथदर्शक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणा-या जिल्हा परिषदेसारख्या संस्थेला ग्रामीण विकास अध्ययन केंद्राचे (सीएसआरडी) कार्य मार्गदर्शक आहे. महाराष्ट्रातील दुष्काळमुक्त गावांचा अभ्यास व त्यांची यशोगाथा आम्हाला पथदर्शक ठरतील, असे उद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी काढले.

सीएसआरडीच्या वतीने ‘दुष्काळाशी सामना’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी झाले. राज्याच्या विविध भागात काम करणारे कार्यकर्ते, ग्रामस्थ व स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोक समिती, औरंगाबादचे शांताराम पंदेरे, ‘कासा’चे के. व्ही. थॉमस, ‘अ‍ॅफ्ररो’चे एस. डी. साळुंखे, कलानंद मणी, ‘वसुंधरा’चे रामदास बचाटे उपस्थित होते.

प्रारंभी सीएसआरडीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सीएसआरडीचे संचालक प्रा. के. के. कनोजिया यांनी प्रास्ताविक केले. पाण्याच्या वापराच्या योग्य नियोजनामुळे व ग्रामस्थांच्या सहभागामुळे दुष्काळावर मात करता येते हे नऊ गावांनी सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले. वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास करून शाश्वत विकास शासन कशा पद्धतीने करत आहे, याची माहिती वसुंधरा प्रकल्प अधिकारी रामदास बचाटे यांनी दिली.

या प्रकल्पासाठी डॉ. सुरेश पठारे, प्रा. प्रकाश पाटील, प्रा. सुरेश मुगुटमल, सॅम्युअल वाघमारे, डॉ. जगदीश जाधव, प्रा. प्रदीप जारे, प्रा. रमेश वाघमारे, डॉ. जयमन वर्गीस, प्रा. विजय संसारे व प्रेरणा विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. कार्यशाळेत दुष्काळाशी यशस्वी सामना केलेल्या गावांतील प्रकल्पांवर चर्चा होत असून या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाशी सामना कसा करावा, याचा आराखडा या वेळी तयार करण्यात येणार आहे.

यशोगाथांचे संकलन
कासारे अगडगाव, वाडजी, आडगाव खुर्द, शिवणे, बालेवाडी, थेरगाव या गावांनी दुष्काळाला यशस्वीरीत्या तोंड दिले. या गावांची यशोगाथा या पुस्तकात आहे. फोरम फॉर कलेक्टिव्ह फॉर्म फॉर कोऑपरेशन यांच्या पुढाकाराने व सीएसआरडी, कासा, पीसफुल सोसायटी, अ‍ॅफ्ररो, इन्साफ लोक समिती, सीएनआयबीएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात आला.