आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस विभागाने अडवलेल्या जलवाहिनीचा प्रश्न सुटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निर्मलनगर भागातील गोळीबार मैदान येथे 'फेज टू' अंतर्गत १५७ मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचा प्रश्न अखेर सुटला. संबंधित जागा पोलिस विभागाची असल्याने अनेक दिवसांपासून हे काम रखडले होते. यासंदर्भात महापौर सुरेखा कदम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या कामासाठी परवानगी मिळवली. हे काम मार्गी लागल्यानंतर निर्मलनगर भागातील नागरिकांना लवकरच नवीन टाकीतून पुरेसे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

निर्मलनगर भागात फेज टू अंतर्गत उंच टाकी उभारण्यात आली आहे. टाकीच्या इनलेटचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले, परंतु जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने या टाकीतून पाणीपुरवठा करता येत नव्हता. या भागात पोलिस विभागाची जागा असल्याने जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. या भागातील पाणीप्रश्न गंभीर असून त्यासाठी नवीन टाकीतून पाणीपुरवठा होणे आवश्यक होते. प्रभागातील नगरसेविका शारदा ढवण यांनी त्यासाठी पाठपुरावा केला, परंतु पोलिस विभागाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

पोलिस विभागाच्या परवानगीशिवाय महापालिकेला १५७ मीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम करत येत नव्हते. त्यामुळे महापौर कदम यांनी स्वत: या कामात लक्ष घातले. जलवाहिनीच्या कामासाठी परवानगी मिळावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून जलवाहिनी टाकणे आवश्यक असल्याचे सांिगतले. अखेर डॉ. त्रिपाठी यांनी पोलिस विभागाच्या जागेतून जलवाहिनीचे काम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम मार्गी लागले आहे.

महापौर कदम यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, सभागृह नेते अनिल शिंदे, माजी महापौर शीला शिंदे, भगवान फुलसौंदर, नगरसेविका शारदा ढवण, दिगंबर ढवण, उपायुक्त अजय चारठाणकर, यंत्र अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते. जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची इंची लाइन तातडीने सुरू करा, अशी सूचना महापौर कदम यांनी संबंधित ठेकेदार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. हे काम सुरू करताना परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामातील अडचणी लवकर सोडवणार
^नगरकरांसाठीजिव्हाळ्याचीअसलेल्या फेज टू योजनेच्या कामास गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी योजनेच्या कामात येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. काही ठिकाणी कामास उशीर होत असून त्यासाठी संबंधितांची समजूत काढण्यात येत आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून आपल्या कार्यकाळात योजना सुरू व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. -सुरेखा कदम, महापौर.

नव्या वसाहतींनाही मिळणार पाणी
निर्मलनगरभागात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. या भागाला जुन्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परिणामी जुन्या नवीन वसाहतींना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे कठीण झाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील हजारो नागरिकांची गैरसोय सुरू होती. त्यामुळे परिसरातील नवीन टाकी सुरू होणे गरजेचे होते. आता येथील प्रश्न मार्गी लागला असून येथील जुन्या नवीन वसाहतींना लवकरच नवीन टाकीतून पूर्ण दाबाने मुबलक पाणी मिळणार आहे.

शेतकऱ्यांचीही काढली समजूत
रखडलेल्या फेज टूचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापौर कदम यांच्यासमोर आहे. महापौरपदावर येताच त्यांनी फेज टूची रखडलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. विळद परिसरातील काही शेतकऱ्यांनी मुख्य जलवाहिनीच्या कामास विरोध केला होता. त्यामुळे हे काम अनेक दिवसांपासून बंद होते. महापौर कदम यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यामुळे हे कामही आता सुरू झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...