जामखेड - आगे कुटुंबीयांना शासनस्तरावर सर्वतोपरी मदत देण्याबरोबर या कुटुंबास पोलिस संरक्षण व शेतजमीनही देण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल यांनी दिले.थूल व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी (3 मे) रात्री साडेआठच्या सुमारास सुमारास खर्डा येथे भेट दिली. थूल यांनी आगे कुटुंबाची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी आगे कुटुंबाशी चर्चा करताना थूल यांनी हे आश्वासन दिले. या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तहसीलदार प्रदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार जयसिंग भैसडे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.
आगे कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी पक्के घर, उपजीविकेसाठी शेतजमीन, मुलीच्या शिक्षणाची सोय व या कुटुंबाची सुरक्षा यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष थूल व मंत्री राऊत यांनी हमी दिली.
दरम्यान, रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खासदार हुसेन दलवाई, भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल मोटे यांनी आगे कुटुंबाची भेट घेतली.
आंतरजातीय विवाह काळाची गरज
जातीयवाद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह ही काळाची गरज आहे. माझी पत्नी ब्राह्मण समाजाची आहे, तर मुलाची बायको चिनी आहे, असे खर्डा येथे भेट दिल्यानंतर
खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.