आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Action Taken By Congress For Janlokpal, Anna's Letter To Sonia Gandhi

जनलोकपालसाठी काँग्रेसचे प्रयत्नच नाहीत,अण्णांचे सोनिया गांधींना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - जनलोकपाल विधेयकास मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न काँग्रेसकडून होत नसल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली़ हिवाळी अधिवेशनात सक्षम जनलोकपाल विधेयक संमत व्हावे यासाठी हजारे 10 डिसेंबरपासून राळेगणसिद्घीतील संत यादवबाबा मंदिरात उपोषणास बसणार आहेत. जनतंत्र मोर्चा व भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे कार्यकर्ते जिल्ह्यांत आंदोलन करून समर्थन देणार आहेत़
हजारे यांनी यापूर्वी पंतप्रधान मनमोहनसिंग, विरोधी पक्षनेते अरुण जेटली व सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून जनलोकपाल मंजूर करण्याचा आग्रह धरला आहे़ .
सरकार - विरोधी पक्षांकडून विधेयक मंजुरीसाठी प्रयत्न होत नसल्याबद्दल हजारे यांनी नाराजी व्यक्त करून संबंधितांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे़ आता हजारे यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले असून सर्वात जास्त खासदार असूनही काँग्रेसकडून जनलोकपाल मंजुरीसाठी चालढकल का होत आहे, असा प्रश्न विचारला आहे़
मतप्रदर्शन करणे व प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत़ भ्रष्टाचार संपवण्याचे आपण केवळ जाहीर मतप्रदर्शन केले, परंतु अंमलबजावणी केली नाही. जनलोकपाल कायदा देशातील भ्रष्टाचार कमी करण्याचा चांगला पर्याय आहे़ परंतु दोन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होत नाही़ या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली असती तर भ्रष्टाचारास ब्रेक लागला असता, असा विश्वास त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. जनलोकपाल, ग्रामसभांना अधिकार, राइट टू रिजेक्ट, राइट टू रिकॉल असे कायदे संमत झाले असते तर सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भ्रष्टाचार थांबला असता़ परंतु सरकारच्या इच्छाशक्तीअभावी हे कायदे झाले नाहीत. मग भ्रष्टाचाराचा रोग कसा नष्ट होईल? असा सवालही हजारे यांनी सोनियांना केला आहे़