आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९९३ अंगणवाड्यांना इमारतीच नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अंगणवाडीहा शिक्षणाचा प्राथमिक पाया मानला जातो. पण हा पायाच कच्चा असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ९९३ अंगणवाड्यांना इमारती नाहीत. त्यामुळे या अंगणवाड्या समाजमंदिरे, जुनाट खोल्यांमध्ये भरवल्या जात आहेत. शासनाकडून अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यासाठी तरतूद होऊ शकते. पण जागा खरेदी करण्याबाबत कोणतीही तरतूद नसल्याने चिमुरड्यांची गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागात अंगण परिसरात चालवले जाणारे माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अंगणवाडीमार्फत भर दिला जातो. तीन ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच माता-बालकांचे आरोग्य, आहार, कुपोषण यासह इतर महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देण्याचे काम अंगणवाडीतूनच केले जाते. भारत सरकारने १९७५ मध्ये बालविकास योजना कार्यरत केली. गावात अंगणवाडीची गरज असल्यास तशी मागणी केल्यानंतर अंगणवाडीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध होतो. परंतु, अंगणवाड्या मंजूर असूनही ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे इमारतींना जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९९३ अंगणवाड्या इमारतीअभावी मंदिरात, तसेच सार्वजनिक आडोसा पाहून भरवल्या जातात. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडींचे नियंत्रण केले जाते. अंगणवाडी उघड्यावर भरवल्या जात असल्याचे खापर जिल्हा परिषदेवर फोडले जाते. वास्तविक इमारत बांधण्यासाठी तरतूद आहे, पण जागा खरेदीसाठी नसल्याने जिल्हा परिषदही हतबल झाली आहे. जिल्ह्यात हजार ८०१ अंगणवाड्या आहेत, पैकी हजार ८२८ अंगणवाड्यांना इमारती आहेत. जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांचा पर्याय समोर ठेवला. त्यानुसार जिल्ह्यात ४९८ अंगणवाड्यांचा ठेकाही देण्यात आला. तथापि अवघ्या ३६० अंगणवाड्याची कामे पूर्ण झाली आहेत. ११४ अंगणवाड्यांची कामे अपूर्ण आहेत, तर २४ ठिकाणी जागेची अडचण अाहे.
संबंधित ठेकेदाराने सर्व कामे डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना स्थायी समितीने गुरुवारी दिल्या. परंतु, जागा उपलब्धतेबाबत ठोस निर्णय झाला नाही. तसेच २०१३-२०१४ या वर्षात १४७ अंगणवाड्यांचा निधी ग्रामपंचायतींना दिला आहे. तथापि अवघ्या ३५ अंगणवाड्यांचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते, तर ११२ अंगणवाड्यांचे काम सुरू झाले नाही. कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असताना, कुपोषण निर्मूलन करणाऱ्या यंत्रणेकडे दुर्लक्ष केले जाते. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न दुर्लक्षित करून इमारतीसाठी जागा उपलब्ध करण्याचे आैदार्य दाखवले जात नसल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.