आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Development Work, After Two Years Fund Not Spend

विकासकामांचा ठणठणाट, दोन वर्षे उलटूनही नगरसेवक स्वेच्छा निधी वॉर्ड विकास निधी अखर्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटले, तरी निम्म्यापेक्षा अधिक प्रभागांमध्ये एकही ठोस विकासकाम मार्गी लागलेले नाही. थकीत बिले मिळत नसल्याने एकही ठेकेदार काम करण्यास तयार नाही. परिणामी नगरसेवक स्वेच्छा निधी वॉर्ड विकास निधीमधून होणारी कोट्यवधी रुपयांची कामे ठप्प आहेत. या परिस्थितीमुळे एकीकडे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे हतबल झालेले नगरसेवक प्रशासनाच्या नावाने बोंब मारत अाहेत.
डिसेंबर २०१३ मध्ये मनपाची निवडणूक झाली. विकासकामांची मोठमोठी आश्वासने देऊन निवडणुकीत मते पदरात पाडून घेण्‍यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही प्रभागात एकही ठोस विकासकाम मार्गी लागल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. नागरिकांनी ३४ प्रभागांतून ६८ नगरसेवक निवडून दिले. प्रभागांमधील विकासकामांसाठी प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी वार्ड विकास निधी असा सुमारे दहा लाखांचा निधी मंजूर आहे. आपल्या निधीतील कामे मंजूर (खतवण्यासाठी) करण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी बांधकाम विभागाचे दरवाजे झिजवले. या विभागाने आपली जबाबदारी पार पाडत विविध विकासकामांचे अंदाजपत्रक तयार केले. परंतु अंदाजपत्रक तयार असूनही एकही ठेकेदार ही कामे करण्यास तयार नाही. त्यामुळे तब्बल सात कोटींचा निधी तसाच पडून आहे.

यासंदर्भात नगरसेवकांनी प्रशासनाला महासभेत वेळोवेळी जाब विचारला. परंतु निर्ढावलेल्या मनपा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या रोषाला तोंड देण्याची वेळ येऊ नये, यासाठी काही नगरसेवकांनी स्वत:च्या प्रभागात तुरळक विकासकामे केली. काहींनी तर नगरसेवक निधीवर अवलंबून राहता खासदार-आमदारांचा निधी वापरून प्रभागात विकासकामे केली. अशा नगरसेवकांची संख्या मात्र नाममात्रच आहे. नागापूर-बोल्हेगाव, मुकुंदनगर, झेंडीगेट अशा भागातील नागरिकांना तर विकासकामे दूरच, साध्या मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे अनेक नगरसेवक हतबल झाले आहेत. यासंदर्भात विरोधक काहीच बोलण्यास तयार नाहीत. सत्ताधारी केवळ विकासाच्या गप्पाच मारत आहेत, तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळी आली आहे.
नगरसेवकांना हवाय रोख निधी
मागच्यामहासभेत सर्वच नगरसेवकांनी कामे होत नसल्याने बोंब ठोकली. काहींनी तर नगरसेवक निधी रोख स्वरूपात देण्याची मागणी केली. नगरसेवकांना ठेकेदारांच्या पाठीमागे फिरावे लागते, तरी ठेकेदार काम करत नाहीत. त्यामुळे निधी रोख स्वरूपात द्या, तरच ठेकेदार नगरसेवकांच्या पाठीमागे पळून प्रभागातील विकासकामे मार्गी लागतील, अशी नगरसेवकांची मागणी होती. परंतु या मागणीला केराची टोपली दाखवली गेली.
टक्केवारीने ठेकेदार त्रस्त
थकीतबिले काढण्यासाठी मनपाच्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना टक्केवारी द्यावी लागते. मुख्य लेखाधिकारी हितेश विसपुते यांच्यावर तर आमदार संग्राम जगताप यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. यावरूनच ठेकेदारांना थकीत बिलांसाठी कशी अडचणींची शर्यत पार करावी लागते, ते स्पष्ट होते. आजही अनेक ठेकेदारांची अनेक वर्षांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत.