आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भूमाता' महिलांना चौथऱ्यावर मनाई, सहधर्मादाय अायुक्तांचे संघटनेला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/नेवासेफाटा - भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर चढून शनी दर्शन घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सहधर्मादाय आयुक्तांनी भूमाताच्या महिलांना चौथऱ्यावर चढण्यास मनाई केली असून २१ जानेवारीला तसे आदेश काढले आहेत. देवस्थानच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घातल्याचे स्पष्ट करताना विश्वस्त मंडळासमवेत बैठक घेऊन समन्वयातून निर्णय घेण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.

हिंदू जनजागृती समिती हिंदुत्ववादी सहधर्मादाय अायुक्त एस. जी. डिगे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशात २८ नाेव्हेंबरला एका युवतीने चौथऱ्यावर चढून शनी देवाचे दर्शन घेतल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत अहवाल मागवला होता. हा अहवाल प्राप्त झाला असून धर्मादाय उपआयुक्तांनी दिलेल्या अहवालात भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनातून देवस्थानच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भूमाता ब्रिगेडने देवस्थानला आव्हान देत चौथऱ्यावर घुसून दर्शन घेण्याचा इशारा देवस्थानच्या बाजूने, तसेच परंपरा मोडणाऱ्यांच्या विरोधात उतरण्याचा विविध संघटनांनी दिलेला इशारा यातून देवस्थानच्या मालमत्तेला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ (ई) नुसार भूमाताच्या पदाधिकाऱ्यांना चौथऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ४०० महिलांसह २६ जानेवारीला शनिशिंगणापूरला येऊन चौथऱ्यावरून शनी मूर्तीचे दर्शन घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून सातत्याने त्यांनी हे आव्हान देत आपण भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तसेच शिंगणापुरातील रुढी, परंपरा कोणत्याही परिस्थितीत मोडू देणार नसल्याचा इशारा हिंदू जनजागृती समिती, वारकरी मंडळ यांच्यासह विश्वस्त मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ आदींनी दिला आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिशिंगणापूर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

अनुचित प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली असून मंदिर परिसरात पाेलिसांची विशेषत: महिला पाेलिसांची माेठी फाैज तैनात करण्यात येणार आहे. भूमाता ब्रिगेडच्या महिला त्यांना विरोध करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ आमने-सामने येणार नाहीत, याची खबरदारी प्रशासन घेणार आहे. देवस्थान परिसराला पोलिस संरक्षण देण्याची मागणी विश्वस्त मंडळाने यापूर्वीच जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडे केली आहे.

पावित्र्य राखून दर्शन
२६जानेवारीला ठरल्याप्रमाणे राज्यभरातून शेकडो महिला शनिशिंगणापूर येथे येणार आहेत. आम्ही सनदशीर शांततेच्या मार्गाने दर्शनरांगेतून शनि चौथऱ्यापर्यंत जाऊ. त्यानंतर रांगेतील एकेक महिला चौथऱ्यावर जाऊन आमच्या देवाचे अर्थात शनी मूर्तीचे दर्शन घेणार आहोत. देवाचे अथवा देवस्थानचे कोणतेही पावित्र्य भंग होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. आदेशाप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर विश्वस्तांशीही चर्चा करण्यात येईल. तृप्ती देसाई, प्रमुख,भूमाता ब्रिगेड.

सहकार्याचे आवाहन
सध्या पुरुषांनाही शनिच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे कुणीही चौथऱ्यावर जाण्याचा अाग्रह धरू नये. अाम्ही रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत अाहाेत. २०११ पासून पुरुषांनाही अाेल्या वस्त्राने चौथऱ्यावर जाऊन दर्शन करण्यास बंदी अाहे. तेव्हापासूनच सर्वांना समान दर्शन व्यवस्था आहे. विश्वस्त मंडळ सर्व संघटनांचा अादर करते. त्यामुळे शनैश्वर देवस्थानला सहकार्य करावे. नानासाहेब बानकर, उपाध्यक्ष,देवस्थान.

हेलिकॉप्टरचा पर्याय
सनदशीर मार्गाने पोहोचण्यास विरोध झाल्यास शनिशिंगणापूरला जाण्यासाठी देसाईंनी हेलिकॉप्टरचा पर्याय ठेवला आहे. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून हेलिकॉप्टर बुक केले आहे. शनिवारी सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे फॅक्स करून परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती देसाईंनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.