आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेट टॉप बॉक्ससाठी तूर्त मुदतवाढ नाही, निम्म्या जिल्ह्याचे प्रसारण झाले बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ देण्याची केबल चालकांनी केलेली मागणी केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने फेटाळून लावल्याने सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. दरम्यान, सेट टॉप बॉक्स उपलब्धतेबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी हॉल येथे जिल्ह्यातील सर्व केबलचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती.मात्र, बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सेट टॉप बॉक्स बसवण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपल्याने निम्म्या जिल्ह्याचे प्रसारण बंद झाले अाहे.

कोट्यवधीचा कर बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने सेट टॉप बॉक्स बसवणे अनिवार्य केले होते. त्यासाठी सरकारने ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्सला बसवण्यासाठी मुदत दिली होती. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून विविध वाहिन्यांना जाहिराती देऊन सेट टॉप बॉक्स बसवण्याचे आवाहन केले होते, तरी देखील अनेक ग्राहकांनी बॉक्स बसवल्याने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रसारण बंद करण्यात आले होते. नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागातील प्रसारण ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद झाले आहे. जिल्ह्यात ४६ हजार ६०७ केबल ग्राहक आहेत. त्यापैकी १५ हजार ९९० ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवले आहेत.
शहरात १४ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी हजार ६४८ ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवले आहेत. ३० हजार ६१७ ग्राहकांनी अद्याप सेट टॉप बॉक्स बसवले नसल्यामुळे त्यांचे प्रसारण बंद करण्यात आले होते. नगर महापालिका हद्दीतील नागापूर, बुऱ्हाणनगर, नागरदेवळे यासह दरेवाडी, घुलेवाडी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, पाथर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड या भागातील प्रसारण बंद करण्यात आले आहे. सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी ग्राहकांना एक महिन्याची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी नगरमधील केबल ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. संघटनेच्या मुदतवाढ मागणीबाबत उचित कार्यवाहीचे निवेदन प्रशासनाने सरकारला पाठवले होते.
मात्र, सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सरकारने फेटाळून लावल्याने आता मुदतवाढीची शक्यता धूसर झाली आहे. केबल चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे सहायक करमणूक शुल्क अधिकारी वैशाली आव्हाड यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सेट टॉप बॉक्स उपलब्धतेबाबत तसेच मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, याबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही. केबलचे ऑनलाइन सिग्नल बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली अाहे. केबलचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जगताप यांनी शिष्टमंडळासह पालवे यांची भेट घेतली. उबेद शेख, संजय झिंजे, पप्पू जहागीरदार, हाजी बाबा जहागीरदार, आर. आर. अष्टेकर, सोमनाथ चिंतामणी, अस्लम बागवान, संजय शेकडे यांच्यासह केबल ऑपरेटर असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अन्याय करू नये
आंध्र प्रदेश,तेलंगाणा,सिक्कीम, पश्चिम बंगाल केरळ या राज्यात सेट टॉप बॉक्ससाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.त्याप्रमाणेच नगरसह राज्यात सेट टॉप बॉक्ससाठी मुदतवाढ द्यावी. सरकारने प्रसारण बंद करून केबलचालकांवर अन्याय करू नये. मुदतवाढ मिळाल्यास केबलचालकांचे मोठे नुकसान होणार आहे. यावर तातडीने निर्णय घ्यावा. सचिन पोटरे, केबलचालक.

गांधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी केबलचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांना इतर राज्यात सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ दिली आहे, तशी महाराष्ट्रातही द्यावी, अशी मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करू. प्रसारण बंद करण्याबाबत सूचना देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले, असे खासदार गांधी यांनी सांगितले.

सेट टॉप बॉक्सच्या दराबाबत नागरिकांमध्ये संभ्रम
सेट टॉप बॉक्स बसवल्याने अनेकांचे प्रसारण बंद झाल्यानंतर ग्राहक केबलचालकांकडे सेट टॉप बॉक्सची मागणी करत आहेत. मात्र, केबलचालकांकडे पुरेशा प्रमाणात सेट टॉप बॉक्स उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची वणवण सुरू झाली आहे. एकीकडे सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र सेट टॉप बॉक्सच्या दराबाबत संभ्रम आहे. सेट टॉप बॉक्ससाठी १५००, १६००, १४०० रुपये असे ग्राहकांकडून घेतले जातात. किमतीबाबत धोरण स्पष्ट नसल्याने ग्राहकांमध्येही दराबाबत संभ्रम आहे.

पंधराशे रुपये भरणे कठीण
सेट टॉप बॉक्ससाठी एकाचवेळी दीड हजार रुपये भरणे कठीण आहे. केबल बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. शहरात एकाचवेळी मोठ्या संख्येने सेट टॉप बॉक्स उपलब्ध करणे ते बसवणे ही मोठी समस्या आहे. त्यामुळे सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. संग्राम जगताप, आमदार.

तीन महिन्यांची मुदतवाढ द्या
दुष्काळी स्थिती असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सेट टॉप बॉक्स बसवणे अशक्य आहे. सरकारने केबलचालकांवर अन्याय करता सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. गुलाबराव जांभळे, केबलचालक.

मुदतवाढ देण्यात येणार नाही
सरकारच्या सूचनेनुसार सेट टॉप बॉक्सबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील केबलचालकांची बैठक घेतली. त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला पाठवण्यात येईल. मात्र, सरकारकडून अद्याप मुदतवाढीबाबत पत्र आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी मुदतवाढ देण्यात येणार नाही. वैशाली आव्हाड, सहायक करमणूक शुल्क, अधिकारी.

डिशला मागणी वाढली
सेट टॉप बॉक्स बसवल्याने निम्म्या जिल्ह्याचे प्रसारण बंद झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोर्चा डिशकडे वळवला आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये डिश खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. डिश खरेदीमुळे केबलचालकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बाजारात सध्या अडीच हजारांपासून ते तीन हजारांपर्यंत किमतींच्या विविध कंपन्यांच्या डिश आहेत.