आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 जीव गेल्यानंतर शाळांच्या निधीबाबत ग्रामविकास खात्याचा सल्‍ला: लोकसहभागातून काहीतरी करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेची निंबोडी येथील शाळा कोसळून तीन विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागल्याची घटना ताजी असल्याने शासनाकडून शाळाखोल्या बांधकामासह विविध कामांसाठी निधी मिळेल अशी आशा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी शाळाखोल्यांसह विविध कामांसाठी १५७ कोटींच्या निधीची मागणी ग्रामविकास खात्याकडे केली. पण त्यावर लोकसहभागातूनच काही तरी करा असा सल्ला देण्यात आला. 
 
पुणे जिल्हा परिषदेत सात आठ सप्टेंबरला राज्यस्तरीय विकास परिषद झाली. परिषदेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट होते. 

या परिषदेसाठी अध्यक्ष विखे यांच्यासह उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदींनी हजेरी लावली. 
 
अध्यक्ष विखे यांनी तेरा मागण्यांचे लेखी निवेदन ग्रामविकास विभागाचे मंत्री, तसेच सचिवांना दिले. त्यात ८३९ नवीन वर्गखोल्या, एक हजार ६३ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी ८१ कोटींचा निधी मिळावा, हमरस्त्यावरील प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत बांधकामासाठी ४२ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मिळावा, शाळाच्या आवारात उच्च दाब वीजवाहिन्या, वीजवाहक तारा आहेत. त्यांच्या स्थलांतरासाठी पाच कोटी, ४७२ अंगणवाड्यांच्या नवीन इमारती दुरुस्तीसाठी २८ कोटी ३२ लाख रुपये निधी मिळावा, जीवन प्राधिकरणाची थकबाकी परस्पर शासन स्तरावर कपात करून घेतली, त्यात कोणत्या ग्रामपंचायतीची किती थकबाकी कपात केली याचा तपशील मिळावा, बीओटी प्रकल्पाचे तांत्रिक प्रशासकीय मंजुरी देण्याचे पुन्हा पीएमजेएसवाय मुख्य अभियंत्यांना द्यावेत यासह १३ मागण्यांचा समावेश होता. 
 
या मागण्यांच्या माध्यमातून शासनाकडून सुमारे १५७ कोटी १० लाखांच्या निधीची लेखी गरज कळवली. परंतु ग्रामविकास खात्याने चमत्कारिक उत्तर देत ही कामे लोकसहभागातून करा, असा खासगी सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तीस कोटींवर जात नाही, अशा परिस्थितीत लोकसहभागातून ही कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
हे कसे शक्य होणार... 
आम्ही ग्रामविकास खात्याच्या सचिवांनाही भेटलो. निंबोडी शाळेसह विविध मागण्यांबाबत सांगितले. परंतु त्यांच्याकडून लोकसहभागातून काही कामे करा, असे सांगण्यात आले. लोकसहभागातून अकराशे शाळाखोल्यांची कामे कशी शक्य आहेत. 
- शालिनी विखे, अध्यक्ष, जिल्हा परिषद. 
बातम्या आणखी आहेत...