आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांना मिळेनात पोषण आहाराचे पैसे, अकोले तालुक्यात आठ महिन्यांपासून बिले थकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - अकोले तालुक्यातील अंगणवाड्यांतील मुलांना शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या महिला बचत गटांना त्यांच्या कामाची बिले आठ महिन्यांपासून मिळाल्याने त्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यांची थकलेली बिले मिळावीत यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
 
अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्यातील महिला बचत गटांची आर्थिक ताकद आधीच बेताची आहे. त्यात त्यांना दहा वर्षांपूर्वी असलेलेच दर देण्यात येत आहेत. शाळांमध्ये पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी या बचत गटांकडे आहे. त्यांना प्रत्येक मुलामागे अवघे चार रुपये ९१ पैसे असा दर देण्यात येत आहे. हा दर दहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यात अजिबात वाढ करण्यात आलेली नाही. हरभरा, मठ, चवळी, वाटाणे यांचा दर दुपटीहून अधिक झाला आहे, पण बचत गटांना मिळणारे दर तसेच ठेवण्यात आले आहेत. 

आजच्या महागाईचा विचार करता या दरात त्यांना अजिबात परवडत नाही, अशी स्थिती आहे. फक्त सामाजिक दायित्वाचा विचार करून बचत गट हे काम करत आहेत. आधीच आर्थिक अडचण त्यात बिलांमध्ये काटछाट करण्याचे काम जिल्हा परिषेदेचे संबंधित अधिकारी करतात. गेल्या आठ महिन्यांपासून बिलेच अदा करण्यात आलेली नाहीत. बिले मंजूर करण्यासाठी अतिरिक्त पैसे मागण्याचा उद्योगही केला जात आहे. पण, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे या बजबजपुरीकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकदा बिले गहाळ झाल्याचेही बचत गटांना सांगण्यात येते. त्यामुळे हे बचत गट त्रस्त झाले आहेत. ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी त्यांची स्थिती झाली आहे. 
 
दरवाढीसह दर महिन्याला नियमित बिले मिळावीत, अशी बचत गटांची मागणी आहे. यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा बचत गटांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी वेळप्रसंगी नगरला येऊन आंदोलनही करण्याचा इशारा त्यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...