आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Horticultural Land Acquisition For Industries Of Farmers,

उद्योगांसाठी शेतकर्‍यांच्या बागायती जमिनींचे संपादन नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शेतकर्‍यांच्या बागायती जमिनी उद्योगविस्तारासाठी घेण्यात येणार नाहीत, असे औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नगर-पुणे रस्त्यावरील सुपा एमआयडीसीत येऊ घातलेल्या नवीन उद्योगांसंदर्भात आयोजित शेतकर्‍यांच्या बैठकीत खेडकर बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अनिल गावित, प्रांताधिकारी संतोष भोर, महामंडळाचे भूमापक सुधीर उगले यावेळी उपस्थित होते.

खेडकर म्हणाले, शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर शिक्के पडले म्हणजे जमीन गेली असे मुळीच नाही. घरे पाडून एमआयडीसी उभारण्याचे शासनाचे धोरण नाही. पुणे, नाशिक व औरंगाबाद येथील शेतकर्‍यांच्या जमिनी यापूर्वी संपादित केल्या आहेत. नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उद्योगांसाठी जमिनी दिल्यास जिल्ह्याचा विकास होईल.

एमआयडीसी केवळ शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करते. उद्योगांसाठी योग्य मोबदला देऊनच शेतकर्‍यांकडून जमिनी घेतल्या जातील. बळजबरीने जमिनी घेतल्या जाणार नाहीत. शेतकर्‍यांचे समाधान करूनच जमिनी घेतल्या जातील. त्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. शेतकर्‍यांनी दराबाबत जरूर आग्रह धरावा. मात्र, जमीन द्यायचीच नाही, अशी भूमिका घेऊ नये. सकारात्मक विचार करावा. बाजारभावानुसारच शेतकर्‍यांच्या जमिनीला भाव मिळणार आहे, असे खेडकर म्हणाले.

डॉ. संजीवकुमार म्हणाले, भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार शेतकर्‍यांच्या जमिनीला आता योग्य भाव मिळणार आहे. विकासासाठी उद्योग आले पाहिजेत, त्याचबरोबर शेतीही टिकली पाहिजे. शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा, ही शासनाची भूमिका आहे.