आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: कोटीचा गांजा, व्याप्तीही मोठी पण गुन्ह्याचा तपासच ठप्प!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तीन महिन्यांपूर्वी तोफखाना पोलिसांनी सुमारे एक कोटीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी आधी पाच नंतर आठजणांना अटक झाली. गुन्ह्याची व्याप्ती परराज्यांत असल्याने तपास वेगाने सुरू झाला. मात्र, आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तपासी अधिकारी असलेल्या पोलिस निरीक्षकावरच निलंबनाची कारवाई झाली. आता या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होण्याची वेळ आली असली, तरी तपास मात्र ठप्प आहे. एलसीबीकडे सोपवूनही तपासात काहीच प्रगती झालेली नाही. तपासातील दिरंगाई आरोपींच्या पथ्यावर पडण्याची वेळ आली आहे. 
 
१७ जूनला भल्या सकाळी तोफखान्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन अालिशान वाहने अडवली. त्यात सुमारे 1 कोटीचा गांजा होता. कुख्यात गांजा तस्कर सीमा पांचारिया हिच्यासह जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आजवरची सर्वात मोठी कारवाई म्हणून या कामगिरीचे मोठे कौतूक झाले. मात्र, तपासात ताेफखाना पोलिसांनी चांगलेच दिवे लावले. आणखी आठजणांना अटक केल्यानंतर पीआय मानगावकर यांनी आरोपींशी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी त्यांना निलंबित केले. 
 
तोफखाना पोलिसांनी सुरुवातीला संदीप दिलीप अनभुले (घुमरी, ता. कर्जत), सीमा राजू पांचारिया (कासार दुमाला, ता. संगमनेर), सागर भीमाजी कदम (आश्वी, ता. संगमनेर), गणेश शिवाजी लोणारी (जोर्वे, ता. संगमनेर) शोभा कृष्णा कोकाटे (नालेगाव, नगर) यांना अटक केली होती. तपासात आणखी नावे निष्पन्न झाल्याने नवनाथ एकनाथ आहेर (कासार दुमाला, ता. संगमनेर), सलीम उस्मान शेख (श्रीरामपूर), विजू ऊर्फ राजू विश्वनाथ भंडारी (कुकाणे), फारूख शेख हुसेन (शेवगाव), गुलजार अलीभाई शेख (शेवगाव), अशोक माणिक तरटे (आष्टी, जि. बीड), प्रल्हाद गोविंद काटे (नेवासे), मुक्तार कादर शेख (संगमनेर) यांनाही अटक झाली. 
 
आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली गेल्याने खातेनिहाय चौकशीअंती दोषी ठरवून पीआय मानगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे महिनाभराने तपास तोफखाना पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. त्याला आता दोन महिने होत आले आहेत. गुन्हे शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ असूनही या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. बीड पोलिसांनी मध्यंतरी या गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला दिनकर तुपे, नेवासे) पकडले. त्याला फक्त नगरच्या गुन्ह्यात वर्ग करण्याचे काम एलसीबीने केले. 
 
चौकशीत काय आढळले? 
तोफखानापोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित केल्यानंतरही इतर पोलिसांची चौकशी सुरू झाली. तोफखाना पोलिस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे शोध पथक बरखास्त करण्यात आले होते. नवे पोलिस निरीक्षक आल्यानंतर पुन्हा नव्याने गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले. मात्र, गांजा प्रकरणाच्या चौकशीत अडकलेले कर्मचारीच पुन्हा नव्या पथकात दाखल झाले. त्यांच्या चौकशीत नेमके काय आढळले, हेही गुलदस्त्यातच आहे. सध्याच्या गुन्हे शाेध पथकातील कर्मचाऱ्यांबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या पोलिस दलात याच संदर्भात चर्चा सुरू आहे. 
 
तपासाचे आव्हान कायम 
गांजा तस्करीचातपास तोफखान्याकडून गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर पारदर्शी तपास होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. बीड पोलिसांनी पकडलेला आरोपी वर्ग करून घेण्यापलीकडे एलसीबीने तपासच केला नाही. ही बाब आरोपींच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनीही चौकशी करण्यापलीकडे या प्रकरणात लक्ष घातले नाही. या गुन्ह्यातील आरोपींवर मुंबई, बीडसह इतर ठिकाणीही गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची माहिती गोळा करून त्यांना मोक्का लावण्याच्या तयारीतही पोलिस होते. मात्र, तपासच ठप्प झाल्याने परराज्यात असलेले रॅकेट अजूनही अंधारातच आहे. 
बातम्या आणखी आहेत...