आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Leader Final For Upcoming Election In Maharashtra From Nagar

रणधुमाळी - उमेदवार निश्चितीचा घोळ अजूनही संपेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी अजून कुठल्याही पक्षाने उमेदवार निश्चित केलेले नाहीत. सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे.

सर्वच प्रमुख पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले होते. प्रतीक्षा होती केवळ निवडणूक आयोगाच्या घोषणेची. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुतीने जोरदार तयारी केली आहे. इच्छुक उमेदवार मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.

आघाडी व महायुतीत सुरु असलेला जागावाटपाचा घोळ संपला नसल्याने इच्छुकांमध्ये मोठा संभ्रम आहे. अनेकांनी दोन महिन्यांपासूनच दिल्ली, मुंबईच्या वाऱ्या करुन उमेदवारीसाठी पक्षप्रमुखांना साकडे घातले आह. काही विद्यमान आमदारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या आशेने अगोदरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.

अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे या उत्तरेतील मतदारसंघातील कोपरगाव वगळता अन्य मतदारसंघ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत. कोपरगाव हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी श्रीगोंदे मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ आता भाजपकडे गेला आहे. राहुरी, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड हे चार मतदारसंघ शिवसेना-भाजप महायुतीच्या ताब्यात आहेत. नगर, राहुरी, पारनेर, कोपरगाव व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघांत सेना-भाजप विद्यमानांनाच पुन्हा संधी देणार असले, तरी अजून तशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे सेना-भाजपचे सर्वच विद्यमान आमदार घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. अकोले, संगमनेर, शिडी, श्रीरामपूर व नेवासे या मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा जुन्याच आमदारांना पुढे करण्याची तयारी केली असली, तरी अद्यापि त्याची घोषणा झाली नाही. या मतदारासंघांमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. अनेकांनी निवडणुकीची तयारी केली असली, तरी ऐनवेळी नाव रद्द होऊ शकते, या भीतीने त्यांनी खर्चासाठी हात आखडता घेतला आहे.

पितृपक्षामुळे होतेय इच्छुकांची अडचण
विधानसभा निवडणूक प्रक्रियेचा कालावधी ३१ दिवसांचा आहे. मंगळवार (९ सप्टेंबर) पासून पितृपक्ष लागल्याने अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्याची नियोजित तारीख पुढे ढकलली असून, २५ सप्टेंबरला घटस्थापनेचा मुहूर्त साधून ते अर्ज दाखल करणार आहेत. ३ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचाराला सुरुवात होईल.

बालेकिल्ले राखण्याचे आघाडीपुढे आव्हान
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींया नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळाले. मोदी लाटेचा फायदा विधानसभा निवडणुकीतही होईल, अशी भाजपला अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेले अकोले, संगमनेर, शिडी, नेवासे, श्रीरामपूर व श्रीगोंदे हे मतदारसंघ मोदी लाटेत टिकवण्याचे मोठे आव्हान आघाडीपुढे आहे.