आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Leproscopy Specialist Available In Nagar Civil Hospital

शासकीय रुग्णालयात लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बिनटाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे एकही लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ नाही. त्यामुळे गरजुंना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागतो.

नगर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 45 लाख आहे. या लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालयांतर्गत ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच शहरी भागात नगरपालिका व महापालिकेकडेही स्वतंत्र आरोग्य यंत्रणा आहे. या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा पुरवली जाते. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, परंतु बिनटाक्याची लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करणारा तज्ज्ञ नाही. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागते.

नगरचे काम चांगले
दरमहा एक आठवड्याचे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येते. मात्र, त्यासाठी इतर जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकार्‍यांवर अवलंबून राहावे लागते. तथापि, लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ नसतानाही जिल्ह्याचे काम चांगले आहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ मिळावा यासाठी राज्य कुटुंब कल्याण केंद्राकडे (पुणे) पाठपुरावा सुरू आहे. ’’ डॉ. संदीप सांगळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी


नाशिक, बीडचा आधार
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयातून डॉ. वसंत जमदाडे यांना बोलावले जाते. बीडहूनही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावावे लागते. बर्‍याचदा हे तज्ज्ञ डॉक्टर कामात व्यग्र असल्याने त्यांची वेळ मिळत नाही.

प्रत्येक तालुक्यातील एका अधिकार्‍याला प्रशिक्षण
स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍याला लॅप्रोस्कोपी प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. अकोले येथील एका वैद्यकीय अधिकार्‍याला या प्रशिक्षणासाठी पाठवले आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्यातून एका वैद्यकीय अधिकार्‍याला हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मार्च 2014 पर्यंत जिल्ह्यातील तज्ज्ञांकडून लॅप्रोस्कोपी केल्या जातील.’’ डॉ. रवींद्र निटूरकर, जिल्हा शल्य चिकित्सकप्रशासकीय पातळीवरून वेळोवेळी लॅप्रोस्कोपी तज्ज्ञांची मागणी करण्यात आली, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एका शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून अवघे 75 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे शहरातील खासगी डॉक्टरही या शस्त्रक्रिया करण्यासाठी जात नाहीत.

आरोग्य यंत्रणांशी बोलू
बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल आहे. पण ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करणे गरीब रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणांनीच ही सुविधा उपलब्ध करायला हवी. त्यासाठी आरोग्य विभागाशी चर्चा करून जिल्ह्यासाठी स्वतंत्र लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.