आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No One To Encourage Promising People Uttam Kamble

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढ म्हणणार्‍यांची संख्या आता कमी, उत्तम कांबळे यांची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - पाठीवर हात ठेवून लढ म्हणत आशीर्वाद देणार्‍यांचे हात आज कमी झाले आणि पाठीत सुरा मारणार्‍यांची संख्या जास्त झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत धडपडणार्‍या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करून आत्मबळ निर्माण करण्याचे कार्य दत्ता खेमनर यांनी ‘हेल्पिंग हँड्स’च्या माध्यमातून सुरू केले, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी सांगितले.

‘हेल्पिंग हँड्स’ या सामाजिक संस्थेने उच्च शिक्षण घेणार्‍या गरजू सोळा विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा धनादेश दिला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कांबळे बोलत होते. ते म्हणाले, खेमनर यांनी धडपडणार्‍या मुलांना बळ देऊन उत्तम माणूस घडवण्याचे कार्य सुरू केले आहे. दारिद्रय़, विषमता, अंधर्शद्धा या पाशात जे जन्मतात, तेच समृद्ध जीवन घडवू शकतात. संकटांना दाबून जे वर निघण्याची धडपड करतात, त्यांनाच दारिद्रय़ाचे चटके बसतात. अशा मुलांमध्ये जग बदलण्याची खुन्नस असते. आजची तरुण पिढी ऊर्जा न वापरता लढत असल्याने अधोगतीच्या मार्गावर आहे. अशा तरुणांचा देश महासत्ता बनणे अशक्य आहे.

काही जण बर्गर खाऊन मरतात, तर काही जण दारिद्रय़ामुळे भाकरीशिवाय मरतात. त्यांना सलाइन देऊन जगवण्याचे आपले काम आहे. युवकांनी स्वत:वर विश्वास ठेवून जग बदलण्याची ताकद निर्माण करावी. सध्या शिक्षणासारखी सर्वाधिक विक्री होणारी दुसरी गोष्ट राहिलेली नाही. ही व्यवस्था बदलायला हवी. आपण परावलंबी होणार नाही, एवढीच मदत घेऊन पुढील शिक्षण घ्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.