आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Record On Employee, Security Gurd To The Police, Unwillingness Of Nagarkar

नोकर, सुरक्षारक्षकांची नोंदच पोलिसांकडे नाही; नगरकरांची उद‍ासिनतेचा परिणाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - घरगुती नोकर, तसेच सुरक्षारक्षक, वाहनचालक यांच्याबाबतची इत्थंभूत माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात कळवण्याबाबत नगरकरांमध्ये कमालीची उदासीनता आहे. शहरातील एकाही नागरिकाने याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात अजून कळवलेली नाही. उद्योजक मुनोत खून खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली.


उद्योजक रमेश व चित्रा मुनोत यांचा 2 डिसेंबर 2007 च्या रात्री निर्घृण खून झाला. सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार साकेत यानेच दरोड्याचा कट रचला होता. मुनोत यांच्याकडे पूर्वी काम केलेल्या नोकरांची मदत साकेतने यासाठी घेतली. या खटल्यात सहाजणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील पाचजण परप्रांतीय आहेत. राजू संपत दरोडे या मुनोत यांच्या गाडीवर पूर्वी चालक म्हणून काम केलेल्या स्थानिक नोकराचाही आरोपींत समावेश आहे. ऐवज चोरुन नेताना या नोकरांनी मुनोत दाम्पत्यालाच संपवले. काम करताना या नोकरांनी घराच्या कानाकोपर्‍याची माहिती घेतली होती. घरात मुनोत दाम्पत्य एकाकी असल्याचे पाहून या नोकरांनी हे कृत्य करण्याचे धाडस केले.

घरगुती नोकर, सुरक्षारक्षक, वाहनचालक यांचे फोटो, रेशनकार्ड, पत्ता आदींची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये घरगुती नोकरांचा आढळलेला संबंध लक्षात घेता नागरिकांनी अशी माहिती पोलिस ठाण्यात देणे इष्ठ असते. काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तपासासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. पुणे, मुंबई आदी मोठय़ा शहरांत एकाकी राहणार्‍या वृद्ध दाम्पत्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, एकाही नागरिकाने आपल्या घरगुती नोकरांची माहिती पोलिस ठाण्यात कळवलेली नाही. शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरगुती कामांसाठी नोकर ठेवणार्‍यांची संख्या अधिक आहे. नोकरांनीच ऐवज लंपास केल्याच्या विविध घटनांची नोंदही या ठाण्यांमध्ये आहे. मात्र, नोकरांची माहिती कळवून त्यांच्यासाठी ओळखपत्र बनवून घेण्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. अनोळखी लोकांना कामावर ठेवल्यानंतर चोरीचे प्रकार घडल्यास तपास रेंगाळल्याची उदाहरणे आहेत. पोलिसांकडून याबाबत जनजागृती होत नसल्याने असे घडत असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुनोत खून खटल्याच्या निकालानंतर आरोपीना कोणताही पश्चाताप होत नसल्याचे जिल्हा न्यायालयाच्या आवारातील चित्र होते. जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी घरगुती नोकरांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यांना कळवून त्यांचे ओळखपत्र बनवून घेण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.


स्थानिकांना प्राधान्य द्या
घरात नोकर ठेवताना परप्रांतीयांऐवजी स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. वयस्कर नोकरांना प्राधान्य दिल्यास पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्यांच्या किमान गरजा भागतील इतका पगार दिल्यास अडचणी येत नाहीत. नोकर ठेवणार्‍यांनी स्वत:ची नोकरांप्रतीची वर्तणूकही तपासून पाहणे आवश्यक आहे. जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती कळवणे व ओळखपत्र या औपचारिक बाबी आहेत. मात्र, सुरक्षेसाठी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.’’ भय्या गंधे, खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी चालक.


नागरिकांनीच माहिती दिली नाही
घरगुती नोकर ठेवणार्‍या एकाही नागरिकाने आतापर्यंत त्यांच्याकडील नोकरांविषयी आम्हाला माहिती कळवलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. नोकर ठेवतानाच नागरिकांनी ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.’’ विजय पवार, पोलिस निरीक्षक, तोफखाना ठाणे.


स्वत:हून खबरदारी घ्यावी
घरगुती नोकर ठेवणे हा ज्याचा-त्याचा स्वत:चा निर्णय असतो. त्यात कुठेही पोलिसांची भूमिका येत नाही. मात्र, नोकर ठेवताना त्याची पार्श्वभूमी, वर्तणूक याची पडताळणी करणे आवश्यक आहे. स्वत:हून सर्व खबरदारी घेऊनच घरगुती कामांसाठी नोकर ठेवणे योग्य ठरेल.’’ बाळकृष्ण हनगुडे, पोलिस निरीक्षक, कोतवाली ठाणे.