आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रिलायन्स'प्रकरणी गौडबंगाल वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने नुकसान भरपाईपोटी दिलेल्या ५ कोटी ११ लाख रुपयांची महापालिका प्रशासनाने अक्षरश: उधळपट्टी केली. उशिरा जागे झालेले विरोधक याप्रकरणी आक्रमक झाले आहेत, तर काही सत्ताधारी नगरसेवक प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून वादात सापडलेले रिलायन्स प्रकरण सध्या चांगलेच चिघळले आहे. महापालिका प्रशासन स्वत:सह ठेकेदारांची कातडी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
महापालिका हद्दीतील ३९ रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीने अनेक ठिकाणी खाेदकाम केले आहे. त्याबदल्यात नुकसान भरपाई म्हणून कंपनीने मनपाकडे ५ कोटी ११ लाख रुपये जमा केले आहेत. या रकमेतून विविध मजूर संस्थांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले, त्या ठिकाणी कामे न करता दुसरीकडेच कामे झाली. विशेष म्हणजे एकाच कामाचे तुकडे पाडून ठेकेदारांना दोनदा पैसे देण्यात आले आहेत. काही नगरसेवकांनी या रकमेतून सोयीनुसार आपल्या प्रभागात कामे करून घेतली. प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवत मनमानी पध्दतीने कामे मंजूर केली. त्यामुळेच सुरुवातीपासून वादात अडकलेले हे प्रकरण थेट औरंगाबाद खंडपीठापर्यंत पोहोचले. सत्तेत सहभागी असलेल्या "मनसे' नगरसेवकांनी मनपा कार्यालयासमोर आंदोलन करत कामाची पाहणी करण्याची मागणी केली. आयुक्त विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी) पाहणी करण्यास तयारी दाखवली. परंतु राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला. आमच्या प्रभागात झालेल्या कामाची पाहणी करण्याचा अधिकार इतर नगरसेवकांना नाही. त्यामुळे या कामाची पाहणी करू नये, असे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले.
दरम्यान, कामाची पाहणी झालीच पाहिजे, असे पत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी आयुक्तांना दिले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. आता आयुक्त नगरसेवकांसह या कामाची पाहणी करतात, की नेहमीप्रमाणे वेळकाढूपणाची भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उर्वरित कामांसाठी निविदा
रिलायन्सप्रकरणी शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात रिलायन्सच्या पैशांतून सुरू असलेली काही कामे मजूर संस्थांनी पूर्ण केली आहेत, परंतु उर्वरित २१ कामे मजूर संस्थांऐवजी निविदा काढून पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र मनपा प्रशासनाने न्यायालयात सादर केले आहे. यावरून आतापर्यंत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे प्रशासनाने मान्य केल्याचे स्पष्ट होते.
नियमांची पायमल्ली
शासनाच्या नियमाप्रमाणे मजूर संस्थांना शंभर टक्के कामे देता येत नाहीत. कामे देताना ३३ टक्के मजूर संस्था, ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व ३४ टक्के नोंदणीकृत ठेकेदार असे विभागून देणे आवश्यक होते. परंतु मनपा प्रशासनाने नियमांची पायमल्ली करत शंभर टक्के कामे मजूर संस्थांच्या नावावर स्थानिक लाडक्या ठेकेदारांना दिली. त्यामुळे ही कामे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहेत.
अशी आहेत कामे
*प्रोफेसर कॉलनी चौक ते पटवर्धन स्मारक ते कुष्ठधाम (१० लाख)
*भिस्तबाग चौक ते पानसंबळ हॉ. (१५ लाख)
*मुकुंदनगर आर्मी पार्क ते गाेविंदपुरा (१५ लाख)
*हॉटेल हिरा ते पंचवटी परिसर (१० लाख)
*भिस्तबाग चौक ते बसस्टॉप ते वाणीनगर ते एकवीरा चौक (१४ लाख)
*हॉटेल अंबर ते स्मोकर्स क्लब (१० लाख)
*पाइपलाइन रोड ते बसस्टॉप ते वाणीनगर ते भिस्तबाग (१४ लाख)
*पाइपलाइन राेड ते बसस्टॉप ते एकवीरा चौक ते श्रीराम चौक (१४ लाख)
*मराठा मंदिर ते तारकपूर ते लक्ष्मीमाता ते प्रोफेसर कॉलनी (१४ लाख)
*स्वास्थ्य हॉस्पिटल ते महावीरनगर (१४ लाख)
*प्रोफेसर चौक ते समर्थनगर (१४ लाख)
*डोकेनगर ते हॉटेल इंद्रायणी (१४ लाख)
*बागरोजा ते सातभाई मळा ते न्यू आर्टस् कॉलेज (१० लाख)
*बंगाल चौकी ते वसंत टॉकिज ते भोला उडपी (५ लाख)
*दो बोटी चिरा ते चितळे रोड ते नवीपेठ ते बागडपट्टी ते सर्जेपुरा (१४ लाख)
*जयमल्हार ह्युंदाई ते आर्या इन्स्टिट्यूट ते आकांक्षा इंडस्ट्रीज (१४ लाख)
*रेसिडेन्सिअल कॉलेज ते नटराज हॉटेल ते फकिरा कोपरा (१४ लाख)
*मनपा कार्यालय ते वीराज कॉलनी (१४ लाख)
*ह्युंदाई शोरुम ते डॉक्टर कॉलनी ते नक्षत्र लॉन (१४ लाख)
*रेसिडेन्सिल कॉलेज ते अप्पू चौक ते सर्जेपुरा ते कोठला पोलिस चौकी ( १४ लाख)
*दादा चौधरी विद्यालय ते नेता सुभाष चौक ते आनंदी बाजार ते कापड बाजार (१४ लाख)
*मुकुंदनगर व परिसर (१० लाख)
*नगरकर क्लासेस ते विवेकानंद चौक ते श्रीपाद ग्रंथ भांडार (१४ लाख)
*आर्मर्ड ट्रेनिंग सेंटर ते अशोका हॉटेल ते कलेक्टर ऑफिस (१४ लाख)
*रेसिडेन्सिअल कॉर्नर ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते एसी डेपो ते मशीद ते थापर हॉटेल ते राधाबाई कॉलेज (१४ लाख)
*सावेडी बसस्टॅण्ड ते नाना-नानी पार्क (१४ लाख)
*सावेडी कुष्ठधाम रोड ते आयर्वत अपार्टमेंट (१४ लाख)
*रेल्वे आेव्हर ब्रिज ते कायनेटिक चौक ते मेहेराबाद ते देवी रोड ते शास्त्रीनगर (१४ लाख)
*सारसनगर ते यश अपार्टमेंट ते कानडे मळा ते निलायम सोसायटी ते मार्केट यार्ड (१४ लाख)
*नगर कॉलेज ते इवळेनगर ते सारसनगर परिसर (१४ लाख)
*राज हॉस्पिटल ते सारसनगर ते कानडे मळा (१४ लाख)
*साई कॉर्नर ते चिपाडे मळा (१४ लाख)
*वायएमसीए ग्राउंड ते मार्केटयार्ड (१४ लाख)
*भूषणनगर ते शाहूनगर ते गावठाण ते भाग्योदय मंगल कार्यालय (१४ लाख).