आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवासे शहरात सहा दिवसांपासून निर्जळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - नेवासे शहराला नेवासेफाट्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रवरासंगम येथील गोदावरी पात्र कोरडे पडल्यामुळे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या शहरात सहा दिवसांपासून निर्जळी आहे. नेवासे खुर्द मुकिंदपूर, नेवासेफाटा यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून २२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली होती. या योजनेचा ताबा २००१ मध्ये ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता. आता ही योजना कालबाह्य झाली आहे. या वेळच्या भयानक दुष्काळाने योजनेच्या इतिहासात प्रथमच गोदावरी पात्रातील उदभव कोरडा पडला आहे. त्यामुळे गेले सहा दिवसांत पाणी योजनेतील नेवाशाच्या पाण्याची एकही टाकी भरू शकलेली नाही. नेवासे शहर परिसरात पाण्यासाठी महिला नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना अपूर्ण पडत असल्याने नेवाशाचे दोन भाग करून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असे. गेल्या दोन महिन्यांपासून गोदावरी पात्रातील जॅकवेल कोरडे पडले होते. त्यामुळे प्रशासनाने नदीपात्रातच २०० मीटर चर खांदून पाणी पुरवठा सुरू ठेवला होता. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून चरांमध्येही पाणी राहिलेले नाही आणि पाणी उपशामध्ये केवळ गाळच येत आहे.

गेल्या दोन दिवसांत, तर नेवाशाला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन टाक्यांपैकी एकही टाकी भरलेली नाही. त्यामुळे सहा दिवस संपूर्ण गावाचाच पाणीपुरवठा बंद आहे. सोमवारी पुन्हा खांदलेल्या चरांपासून पुढे नदीच्या डोहाच्या दिशेने चर खाेदून पाणी पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न होत असला, तरी केवळ ६-७ दिवसच पाणी पुरवठा होऊ शकेल. पण नंतर काय हा प्रश्न आहेच.

गावातील महिला पुलाखालील विहिरीवर अथवा आजूबाजूंच्या शेतातील विहिरीवर दोन दोन किमी लांब जाऊन पाणी आणत आहेत, तर मध्यमेश्वर नगर आणि नेवासेफाटा परिसरात व्हाॅल्व्हमधून गळणारे पाणी भरण्यासाठी व्हाॅल्व्हवर गर्दी करत आहेत.

पंचायत समितीच्या अिधकाऱ्यांचे हात वर
यादुष्काळी परिस्थितीत नेवाशात सध्या ग्रामपंचायतही नाही आणि नगरपंचायतही अस्तित्वात नसल्याने गावाला वाली नाही, असे म्हणत पंचायत समिती अधिकारी म्हणत लक्ष घालत नाही, तर तहसीलदार नामदेव टिळेकर पगार बंद पडलेला ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि सरपंच सतीश गायके हे लक्ष देत असल्याने पाणी पुरवठा सुरू होता.

पाणीविक्री जोरात
पाणीटंचाईमध्ये बाटली बंद जारने पाणीविक्री करणाऱ्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्पर्धेमध्ये १५ रुपये प्रमाणे मिळणाऱ्या जारची किंमत आता ३५ रुपये झाली आहे, तर ५०० लीटरची टाकी २५०-३०० रुपये झाली आहे.

प्रशासनामुळे टंचाई
म्हाळापूर येथून नेवासे शहरासाठी पूरक पाणी योजना सुरू करावी, अशी सूचना करूनही प्रशासनाने लक्ष दिल्याने आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सतीश गायके, सरपंच,नेवासे.