आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी महोत्सव: ऐनवेळी केला गेला निवड प्रक्रियेत बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रविवारी आयोजित ‘नोकरी महोत्सवा’त जिल्हाभरातून आलेल्या सुमारे साडेचार हजार बेरोजगार युवकांनी नोंदणी केली. मेळाव्यातच बेरोजगारांच्या मुलाखती घेऊन निवड करण्याचे जाहीर करण्यात आले होते, पण ऐनवेळी निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला. त्यामुळे नोकरीच्या आशेने आलेल्या बेरोजगार युवक-युवतींना आता कंपनीच्या बोलावण्याची वाट पाहावी लागणार आहे.

नंदनवन लॉन येथे आयोजित राष्ट्रवादी नोकरी महोत्सवाचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, शंकरराव घुले, अँड. शारदा लगड, सचिन जगताप आदी उपस्थित होते.

महोत्सवासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन नोंदणी केली. जिल्हाभरातून 4 हजार 470 बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी केली. 130 लहान-मोठय़ा कंपन्या या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. यात टाटा, किर्लाेस्कर, एल अँड टी, फिनोलेक्स, बॉश, जॉन डिअर, बजाज, ड्युरासेल, जॉन्सन अँड जॉन्सन, ह्युंदाई आदी कंपन्यांचा समावेश होता. बड्या कंपन्यांमध्ये ‘कमवा अन् शिका’ या उपक्रमांतर्गत नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांनी मेळाव्यास गर्दी केली होती.

मेळाव्यातच पात्र उमेदवारांची निवड कंपन्यांतर्फे करण्यात येईल, असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले होते. ऐनवेळी नियोजनात बदल करण्यात आला. मेळाव्याच्या उद्घाटनानंतर सुमारे दीड ते दोन हजार युवकांनी लेखी परीक्षा दिली. त्यानंतर मात्र मुलाखती झाल्या नाहीत. आवश्यकतेनुसार कंपन्या संबंधित पात्र उमेदवारांशी मोबाइलवर संपर्क साधणार असल्याचे काळे यांनी नंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

या प्रकारामुळे थेट नोकरी मिळण्याच्या आशेने आलेल्या तरुणांची मात्र निराशा झाली. उपस्थितांमध्ये जिल्हाभरातून आलेल्या महाविद्यालयीन युवतींची संख्या लक्षणीय होती. त्यांच्याही पदरी निराशा पडली.

दुकाने बसतील म्हणून दाभोलकरांची ‘सुपारी’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणाविरोधी विधेयकातील आक्षेप असलेल्या सर्व तरतुदी मागे घेतल्या होत्या. विधेयकात चुकीचे काहीच नव्हते. पण लोकांना फसवण्याची दुकानदारी बंद पडण्याची भीती ज्यांना होती अशा प्रवृत्तींनी सुपारी देऊन डॉ. दाभोलकरांची हत्या करवली, असे महसूल राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित ‘नोकरी महोत्सवा’त धस बोलत होते. ते म्हणाले, नथुराम गोडसेंचे विचार अजूनही जिवंत आहेत. वास्तविक विधेयकात तसे काहीच नव्हते. पण दुकाने बसतील अशा प्रवृत्तींनी सुपारी देऊन हे केले. या कृत्याचा मी निषेध करतो.

बलात्काराची दुर्दैवी घटना नुकतीच मुंबईत घडली. अशा घटनांतील आरोपींची रस्त्यांवरून धिंड काढण्याची तरतूद कायद्यात करणे आवश्यक आहे. ‘मोक्का’सारखा कायदा लावून आरोपींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे धस म्हणाले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्याला चांगली दिशा दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 35 हजार युवकांना नोकर्‍या दिल्या आहेत. अनेक योजना राबवल्या जात आहेत. प्रामाणिकपणे इतके काम करूनही आमच्या पक्षाची बाजू व्हिलनप्रमाणे मांडली जाते, अशी खंत धस यांनी व्यक्त केली.

गर्दीमुळे मुलाखती नंतर
अपेक्षेपेक्षा जास्त युवक आल्याने नियोजन बदलावे लागले. लवकरच उमेदवारांचे गट पाडून मुलाखती घेण्यात येतील. दोन हजार युवक-युवतींची लेखी परीक्षा झाली. कंपन्या त्यांच्या मागणीनुसार उमेदवारांशी संपर्क साधणार आहेत. राष्ट्रवादी युवक समन्वयाचे काम करेल
- किरण काळे, प्रदेश उपाध्यक्ष

शिक्षण पद्धती बदलावी
आतापर्यंत साडेनऊ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 55 हजारांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. देशात 2020 पर्यंत 55 कोटी कुशल मनुष्यबळाची गरज भासेल. सध्याचा अभ्यासक्रम जुना असल्याने केवळ पाच टक्के कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते.
- उमेश पाटील, प्रदेशाध्यक्ष


हे निवडणुकांसाठी का ?
आम्ही परीक्षा दिली, पण कंपन्यांनी निवड केली तरच नोकरी मिळेल. किती जागा आहेत, हे सांगितलेले नाही. अर्जात कुटुंबातील सदस्यांची संख्या विचारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे धोरण आगामी निवडणुकीसाठी तर नाही, असा प्रश्न पडला आहे.
- तृप्ती शिंदे, विद्यार्थिनी, नगर

गरिबांना फायदा होईल
मेळाव्यातून आमचे करिअर घडण्याची शक्यता आहे. गरीब विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल. नोकरीसाठी अर्ज केला आहे. लेखी परीक्षा झाली. आता कंपनीकडून बोलावणे येण्याची प्रतीक्षा आहे. या उपक्रमामुळे युवकांना प्रोत्साहन मिळाले.
- शिवांजली दंडवते, विद्यार्थिनी

नोकरी मिळेल का ?
काही विद्यार्थ्यांचे पेपर वीस मिनिटांत घाईने जमा करण्यात आले, तर काही मुलांना एक तासाचा वेळ देऊन भेदभाव केला गेला. मेळाव्यात समजले की हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे. पण मेळाव्याला चार ते पाच हजार विद्यार्थी हजर होते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांचे काय?
- वैभव खरात, विद्यार्थी, शेवगाव