आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य लढ्यातील भटक्या आणि विमुक्तांचे योगदान उपेक्षितच : दादा इदाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : परकियांनी लिहिलेला भारताचा इतिहास भारतीयांना गुलामीचे बाळकडू पाजण्यासाठी लिहिला गेला. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य आणि संस्कृती रक्षणाच्या लढ्यातील भटक्या आणि विमुक्तांच्या महान योगदानाची उपेक्षा हेतुतः करून त्यांची प्रतिमा भटके-भिकारी-गुन्हेगार अशी निर्माण करण्यात आल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जाती-अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते यांनी मंगळवारी केले. 
 
महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजवणाऱ्या वंजारी-बंजारा या जातीसमुहाचा इतिहास मराठीनंतर इंग्रजी भाषेत ‘हिस्टरी ऑफ बंजारा’ या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाला. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका संशोधक डॉ. लीला गोविलकर होत्या.
 
पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र साताळकर, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, नाना भोरे, कवी चंद्रकांत पालवे, डॉ. क्रांतिकला अनभुले, अजित कुलकर्णी, अविनाश बुधवंत, पावन पारिख, अजित माने आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
ज्येष्ठ लेखिका ॲड. मायाताई विठ्ठलराव सोसे यांनी देशभरात फिरून पुरावे आणि संदर्भ गोळा करुन मागील २० वर्षे सातत्यपूर्ण संशोधन करून हा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर आणला आहे. इदाते म्हणाले, १८३१ मध्ये उमाजी नाईक यांनी रामोशी इतर भटक्या जमातींना एकत्र आणून भारतीय स्वातंत्र्याचा पहिला सशस्त्र लढा उभारला. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात तात्या टोपे आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर लढणाऱ्या झाल्कारीबाई, अवंतिकाबाई या वीरांगनांचा इतिहास आणि हजारो भटक्या विमुक्त समाजातील स्वातंत्र्यावीरांचे योगदान इतिहासकारांनी नोंदवले नाही.
 
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींना १८७१ मध्ये गुन्हेगार जमाती कायद्याने जन्मजात गुन्हेगार ठरवले गेले. आजही भारतात १५ कोटी भटके विमुक्त उपेक्षा आणि अन्यायाला तोंड देत असून त्यातील अनेकांना जातीचे दाखले, शिक्षण आणि निवारा, स्मशानभूमीदेखील मिळालेली नाही.
 
ही समाजस्थिती संशोधनातून मांडण्याचे महत्त्वाचे कार्य हिस्टरी ऑफ बंजारा या ग्रंथाने केले अाहे. ॲड. सोसे यांनी सांगितले, वंजारी समाजाचा इतिहास आणि परंपरा देदिप्यमान आहे. नव्या पिढीला त्याची जाणीव करुन दिली, तरच त्यांचे जतन आणि संवर्धन शक्य होईल.
 
याच उद्देशाने केलेले संशोधन कार्य मराठीनंतर आता इंग्रजीत प्रसिद्ध होत असल्याने त्याचा देशव्यापी प्रचार प्रसार होईल संशोधकांना हा इतिहास मार्गदर्शक राहिल. प्रारंभी दिव्यांग कलाकार नीलेश शिंदे याने गणेश वंदना सादर केली. प्रा. दया भोर यांनी सूत्रसंचालन केले. नंदेश शिंदे यांनी आभार मानले.