आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिचे’ लग्न मोडण्यासाठी ‘अंनिस’चे प्रशासनाला साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-सतरा वर्षांच्या युवतीचे 55 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न लावण्याचा अजब न्याय मढीत भरणारी भटक्या समाजाची जातपंचायत करणार आहे. हे अन्यायकारक असून जिल्हा प्रशासनाने यात कृतिशील हस्तक्षेप करावा, अशी मागणी अंधर्शद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे, अशी माहिती ‘अंनिस’च्या कार्याध्यक्ष अँड. रंजना गवांदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अँड. गवांदे म्हणाल्या, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ताया लोखंडे याने गुप्तधनाच्या लालसेपोटी कोवळ्या मुलीचा बळी दिला. त्याला शिक्षाही झाली. दरम्यान, त्याच्या पत्नीचा विवाह जातपंचायतीने दुसर्‍या व्यक्तीशी लावून दिला. शिक्षा भोगून परतलेल्या तायाने जातपंचायतीकडे आपल्या पत्नीची मागणी केली. पण, पंचांनी तायाचे लग्न त्याच्या आधीच्या बायकोच्या भावाच्या मुलीशी लावून दिले. ही मुलगी तेव्हा अवघ्या तीन वर्षांची होती.
या समाजातील परंपरेनुसार वयाची बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला जाते. त्यामुळे ही मुलगी बारा वर्षांची झाल्यानंतर तायाने तिची मागणी केली. मात्र, तोपर्यंत सज्ञान झालेल्या मुलीने आपल्याला हे लग्न मान्य नसल्याची भूमिका स्पष्ट केली. हे प्रकरण मढी येथे भरणार्‍या समाजाच्या जातपंचायतीसमोर गेले. तेथेही वाद न मिटल्यामुळे प्रकरण पाच वर्षे लांबले. या बदल्यात मुलीच्या कुटुंबीयांनी कथित दंडापोटी पंचायतीला सुमारे दोन लाख रुपयांचा दंडही भरला.
दरम्यान, आजवरच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीला या कथित नवर्‍यापासून फारकत हवी आहे. परंतु फारकत देणार नाही, असे 55 वर्षांच्या तायाचे म्हणणे आहे. घटस्फोट हवा असेल, तर तिने एक रात्र तायाबरोबर रहावे, असा अजब न्याय जातपंचायत देणार आहे. त्यामुळे या जातपंचायतीचा निर्णय रद्द ठरवून पंच, अंधर्शद्धा निर्मूलन समिती व युवतीच्या परिवारामध्ये चर्चा घडवून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याचे अँड. गवांदे यांनी सांगितले. यात्रेत कार्यकर्ते जनजागरणही करणार आहेत.