आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीय अधिकार्‍यांना लागली मराठीची गोडी.!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मराठी ही मातृभाषा नसताना शासकीय सेवेत असलेल्या सनदी अधिकार्‍यांनी मराठी भाषा शिकून तर घेतली आहेच, शिवाय तिच्यावर प्रुभत्व मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘मराठी भाषा दिना’साठी त्यांनी समस्त मराठीजनांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण मराठी कसे शिकलो, मराठी शिकल्याचा काय फायदा झाला हेही त्यांनी यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
औरंगाबादमध्ये मराठी शिकलो
जम्मू-काश्मीरचा असल्याने माझी मातृभाषा डोगरी आहे. औरंगाबादला नियुक्ती झाल्यावर मी मराठी शिकलो. नंतर जालना, हिंगोली येथे काम केले. पुण्यात जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यावर माझी मराठी सुधारली. मराठीची गोडी लागल्याने आता मी मराठी वृत्तपत्रे वाचतो. नागरिकांशी होणार्‍या संभाषणातून मराठी अधिक चांगल्या प्रकारे उमगते आहे.’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी
नगरमध्येच समजली नागरी मराठी
मी मूळचा झारखंडचा. 1999 मध्ये गडचिरोलीला माझी पोस्टिंग झाली. तेथे केवळ बंदुकीचीच भाषा असल्याने मराठी शिकता आली नाही. नंतर नांदेड, मालेगाव असा प्रवास झाला तरीही नीट मराठी बोलता येत नव्हते. दरम्यान, मराठी भाषा परीक्षेत 76 टक्के गुण मिळवून मी सर्वप्रथम आलो. खरी मराठीशी ओळख सांगलीला बदली झाल्यानंतरच झाली. तेथे ‘छावा’, ‘मृत्युंजय’ ही पुस्तके वाचली. सांगलीची मराठी अन् नगरची मराठी यामध्ये काहीसा फरक जाणवला. नागरी मराठी शिकण्याची संधी नगरमध्येच मिळाली. आता मी उत्तम मराठी बोलू शकतो. ’’ कृष्णप्रकाश, पोलिस अधीक्षक.
मराठी शिकताना झाल्या गमतीजमती
मी मूळची राजस्थानची. आयएएस झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सहा महिने काम पाहिले. तेव्हापासून मराठी भाषेचे विविध पैलू समजून घेण्याचा मी प्रयत्न सुरू केला. शिकताना बर्‍याच गमतीजमती झाल्या. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण व मराठीत शिक्षा म्हणजे सजा. ‘किती शिक्षण झाले?’ असे एकाने विचारले असता मी पटकन मला शिक्षा झाली नसल्याचे सांगितले. नगरमध्ये आल्यानंतर मराठी पुस्तके, वृत्तपत्रे वाचून मराठीच्या ज्ञानात भर टाकते आहे. मला आता मराठी बोललेले चांगले समजते. मीही बोलू शकते.’’ रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी
दैनिक अहवाल मराठीतून लिहिते
नगरकरांच्या सातत्याने संपर्कात असल्याने मला मराठी बोलता येऊ लागले. मराठी पुस्तके व वृत्तपत्रे मी वाचते. पोलिस दलातील मराठी सहकार्‍यांच्या मदतीने मराठीतील बारकावे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी दैनिक अहवाल मराठीत लिहू शकते.’’ ज्योतिप्रिया सिंग, साहाय्यक पोलिस अधीक्षक