शिर्डी - शिर्डी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मदत करणा-यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा सभागृहात उपस्थित राहून, जनतेचे प्रश्न मांडावेत, विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्यास मी सक्षम आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. प्रवरानगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजप-शिवसेेनेबरोबर युतीचा प्रस्ताव हा थोरातांनीच मांडला होता. असे विखे पाटील यांनी सांगत हा निर्णय केवळ जिल्हा बँकेत सुरु असलेल्या कारभारामुळे घेतला आहे.
आपण कुणाशीही युती केली तरी, थोरात नेहमीच त्रागा करीत असतात. त्यांचा हा त्रागा कशासाठी आहे हे सर्वांना ठाऊक आहे. आगोदर युती करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांची युती न झाल्याने आपण युती केली. राज्यात विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सक्षमपणे निभावत असल्याचे सांगून, आज शेतकरी आत्महत्या, दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस यावर सरकारला धारेवर धरले आहे.
केवळ जिल्हा बँकेचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणूनच युती करण्याचा हा निर्णय आपण घेतला आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात प्रत्येकवेळी शिवसेनेला मदत करणा-या थोरात यांनी पक्षाची बाजू घेऊ नये. प्रत्येकवेळी विखे पाटलांचा त्रागा करण्यापेक्षा सभागृहात जनतेची बाजू मांडावी त्याचा पक्षाला फायदा होईल, असा टोला त्यांनी मारला.
राहुलच्या दौ-यात थोरात कुठे होते?
राज्याच्या दौ-यावर अालेल्या राहुल गांधी यांनी विदर्भाचा दौरा केला त्यांच्या समवेत १५ किमी पायी फिरून आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांच्या आम्ही भेटी घेतल्या. या दौ-यात थोरात मात्र, कुठेही सहभागी झाल्याचे दिसले नाही, असा टोलाही विखे यांनी लगावला. आपली सभागृहातील उपस्थिती आणि ते करत असलेल्या पक्षविरोधी कारवाया याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही विखेंनी थाेरात यांना दिला.