आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Happy With Nagar Development Said Sanjay Kakade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या कामाला नगरमध्ये विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या माध्यमातून नगरमध्ये जी विकासकामे केली, त्याबाबत आपण असमाधानी असल्याची खंत मावळते आयुक्त संजय काकडे यांनी निरोप समारंभात व्यक्त केली. चांगल्या कामातही काही लोकांकडून नेहमीच विरोध झाला.
अशांवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाल्याने काकडे यांना बुधवारी निरोप देण्यात आला. महापौर शीला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या मनपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समितीच्या सभापती अनिता राठोड, माजी महापौर संग्राम जगताप, सभागृह नेते बाबासाहेब वाकळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती किरण उनवणे, उपसभापती मालन ढोणे, उपायुक्त स्मिता झगडे व डॉ. महेश डोईफोडे यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
नगरला रुजू झाल्यापासून काकडे यांना टीकेला तोंड द्यावे लागले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मात्र अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नगरसेवक सचिन पारखे, संगीता खरमाळे, अंबादास पंधाडे, संग्राम जगताप, बाळासाहेब बोराटे, उबेद शेख आदींनी काकडे यांनी केलेल्या चांगल्या कामाचा ऊहापोह केला.
काकडे यांनी मात्र आपल्या भाषणात नगरसेवक व पदाधिकार्‍यांना कानपिचक्या दिल्या. येथील आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निवारण करण्यासाठी नियोजन केले. मात्र, केवळ 2 वष्रे 4 महिने एवढाच कालावधी मिळाल्याने अनेक कामे राहून गेली. चांगले काम करीत असताना काही लोकांकडून नेहमीच विरोध झाला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली, त्यावेळी आयुक्त शहर उद्ध्वस्त करायला निघाले, अशी टीका काहींनी केली. नगरसेवक व पदाधिकार्‍यांना मोठय़ा प्रमाणात निधी देऊनही त्यांची ओरड कायम होती, असे काकडे म्हणाले.
जकात बंद झाल्यावर पुढच्या दोन वर्षांत महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळणार आहे. त्यासाठी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी एकत्र बसून नियोजन करण्याची गरज आहे. पिंपळगाव माळवी येथे महापालिकेच्या मालकीची सहाशे एकर जमीन आहे. राज्यात एवढय़ा मोठय़ा स्वरूपाची मालमत्ता केवळ नगर मनपाकडेच आहे. या ठिकाणी उद्यान, अँम्युझमेंट पार्क सुरू केले, तर कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल, पण त्यासाठी मला काही करता आले नाही, अशी खंत काकडे यांनी व्यक्त केली.
नगरसेवकांचे सहकार्य हवे - आयुक्त काकडे यांनी पुढाकार घेतल्यामुळेच शहरातील रस्ते मोकळे झाले. आता नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नगरसेवकांच्या सहकार्याची गरज आहे.’’ शीला शिंदे, महापौर.