आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्यांनी थकवला १५ कोटींचा कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील५० बड्या थकबाकीदारांनी महापालिकेचे तब्बल १५ कोटी ८६ लाख रुपये थकवले आहेत. या थकबाकीदारांमध्ये उद्योजक, शैक्षणिक सामाजिक संस्था,

रुग्णालये, तसेच शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. प्रत्येक थकबाकीदाराकडे दहा लाखांपासून, तर सुमारे ८० लाख रुपयांपर्यंतची रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून थकीत

आहे. महापालिका प्रशासनाने यापैकी काही बड्या थकबाकीदारांची यादीच "दिव्य मराठी'कडे दिली. एकीकडे सर्वसामान्य नागरिक पै-पै जमवून मनपाकडे मालमत्ता कर

भरत आहे. परंतु निर्ढावलेले हे बडे थकबाकीदार वर्षानुवर्षे मनपाच्या वसुली मोहिमेकडे दुर्लक्ष करत आहेत. यंदा मात्र या बड्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्याचा विडा

महापालिका प्रशासनाने उचलला आहे. त्यासाठी चार दिवसांनी जप्ती मोहीम सुरू होणार आहे. जप्तीचा पहिला हातोडा बड्या थकबाकीदारांवर पडणार आहे.

महापालिकेची स्थापना होऊन एक दशक उलटले. या काळात शहरातील सुमारे ९२ हजार मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची तब्बल ११३ कोटी रुपयांची रक्कम थकली

आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले, परंतु थकबाकीदारांनी वेळोवेळी प्रशासनाचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे थकबाकीच्या एकूण

रकमेत ४२ कोटी रुपयांची दंडाची रक्कम (शास्ती) जमा झाली. चालू अार्थिक वर्षात २३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली असली, तरी आता उर्वरित थकबाकी वसूल

करण्याचे प्रशासनासमोर आव्हान उभे आहे. एकीकडे मनपाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत अाहे. हा

विरोधाभास गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. एकूण रकमेपैकी शहरातील ५० बड्या थकबाकीदारांकडे सुमारे पंधरा कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. विशेष म्हणजे ही

चालू थकबाकी नसून ती अनेक वर्षांपासूनची आहे. प्रशासनाने या थकबाकीदारांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या, परंतु प्रत्येक वेळी या नोटिसांना केराची टोपली दाखवण्यात

आली. त्यामुळे निर्ढावलेले हे बडे थकबाकीदार निश्चिंत आहेत. शहरातील हजारो सर्वसामान्य नागरिक मात्र कारवाईच्या भीतीपोटी नियमितपणे मालमत्ता कराचा भरणा

करत आहेत. काही नागरिक, तर अक्षरश: घरातील सोने मोडून थकबाकी भरतात, मग या बड्या थकबाकीदारांना आतापर्यंत अभय का देण्यात आले, असा प्रश्न निर्माण

झाला आहे. तत्कालीन उपायुक्त स्मिता झगडे यांनी दोन वर्षांपूर्वी जप्ती मोहीम राबवून या बड्या थकबाकीदारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र

एकाही अधिकाऱ्याने असे धाडस दाखवले नाही. काही महिन्यांपूर्वी महापालिकेत उपायुक्तपदी रुजू झालेले उपायुक्त भालचंद्र बेहेरे हे आता बड्या ठेकेदारांवर कारवाई

करण्याचे धाडस दाखवणार आहेत. त्यासाठी चार दिवसांनी थेट जप्ती मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निर्ढावलेल्या या बड्या

थकबाकीदारांचे धाबे दणाणले जाणार आहेत.

मनपाने दिलेल्या थकबाकीदारांची नावे (स र्व आकडे लाखात)

*जिल्हारुग्णालय : ८२७२२२२
*पोलिस हेड क्वार्टर : ७८२८९४०
*हिंदुस्तान पेट्रो : ५६६४२३०
*पोलिस क. केंद्र : २१६१७९३
*एक्सल आर्केड : १५८९२३८
*महावीर विद्या मंडळ : १३४८०४२
*पीडब्ल्यूडी बंगला : १२६२७६४
*हॉटेल प्रेमदान : १२७८२७२
*एसटी महामंडळ : ३३६३२७१
*कैलासभाई जोशी : ११७७२८५
*मंगला शरद मुथा : ६०२६२८३
*मंगला शरद मुथा : ३१८८७९२
*आनंद एज्युकेशन : ३४४२१९४
*जव्हेरी : १११९०१८
*झुंबरलाल पुरुषोत्तम
सारडा : १३३८३३४
*कराचीवाला ब्रदर्स : २२१८३७२
*रिजुमल कराचीवाला : १०४५०३६
*वसंत सातभाई : ११४३४८६
*राधाकिसन मध्यान : १३७२६९६
*दीपाली टॉकीज : ६४७१८०४
*चंद्रशेखर बागडे
नानाभाऊ आव्हाड : ३८९७८०६
*नगर रेल्वे स्टेशन : १०७२०८२८
*बाजार समिती : ९२२९४२८
*शा. तंत्रनिकेतन : १४३८३५४
*आफाली फार्मा.: ५१८९३१९
*निर्मल इंडस्ट्री : १२२१०८९
*पदमा जग्गी : १६८६१४१