आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NOTA Option In Municipal Corporation Election Nagar

महापालिका प्रशासन ‘नोटा’बाबत अनभिज्ञ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगर महापालिकेच्या 15 डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीत ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) बटन उपलब्ध करण्याचे स्पष्ट आदेश 12 नोव्हेंबरला दिले आहेत. तथापि, महापालिका प्रशासन मात्र या आदेशापासून अनभिज्ञ आहे. आयोगाच्या फॅक्सची त्यांना प्रतीक्षा आहे. सध्या मागवलेली आठशे मतदानयंत्रेही आता बदलून घ्यावी लागणार आहेत.

एका जनहित याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना मतदान यंत्रात नकाराधिकाराचे बटण उपलब्ध करुन देण्याचे आदेश 27 सप्टेंबर रोजी दिले. या आदेशानुसार निवडणूक आयोगाने मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नकाराधिकाराचे बटण उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसणारे मतदार त्यांचा अधिकार या बटणाच्या आधारे गोपनियतेने बजावू शकणार आहेत.

नगर महापालिकेच्या 15 डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीत हे बटण उपलब्ध होणार आहे. मतदान यंत्रात उमेदवारांच्या नावाचा क्रम संपल्यानंतर ‘वरीलपैकी एकही नाही’ अशा मजकुराचे बटण असेल. महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी आठशे मतदान यंत्र निवडणूक आयोगाकडून आणले आहेत. या यंत्रामध्ये उमेदवारांचा क्रम संपल्यानंतर ‘एंड’ बटण होते. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदान यंत्र बदलून घ्यावे लागणार आहेत.

निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांनी अजून कार्यभार घेतलेला नाही. त्यामुळे महापालिकेतील अधिकार्‍यांकडे नकाराधिकाराबाबत विचारणा केली असता काहीही माहिती नाही, असेच उत्तर मिळाले. फॅक्स आल्याशिवाय अधिकृतपणे सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

योग्य वापर करावा..
नगरची सध्याची अवस्था पाहता अशा निर्णयाची गरज होती. मतदारांनी नकाराधिकाराचा योग्य वापर केला, तर नक्कीच चांगले उमेदवार निवडून येतील. ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार आहे, तसाच उमेदवार नाकारण्याचाही अधिकार नागरिकांना आहे. त्याचा वापर झाला, तर शहर विकासाला चालना मिळेल.’’ ब्रिजलाल सारडा, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

सक्तीचे मतदान हवे
मतदान सक्तीचे करणे आवश्यक आहे. त्यामुळे घटत चाललेली मतदानाची टक्केवारी वाढेल आणि योग्य उमेदवार निवडून येतील. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. मतदानाबाबत जनजागृती महत्त्वाची आहे.’’ अँड.अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

नागरिकांना पर्याय उपलब्ध
सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लायक नसलेले उमेदवार निवडून येणार नाहीत. परंतु ज्यावेळी शंभर टक्के मतदार मतदान करतील, तेव्हाच या निर्णयाचे सोने होईल. नकाराधिकारामुळे चांगले नगरसेवक निवडून येतील आणि शहराचा विकास होईल.’’ अँड. शिवाजी कराळे, अध्यक्ष, शहर वकील संघ.

योग्य वेळी योग्य निर्णय
महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी शहराची वाट लावली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड निराशा आहे. मात्र, आता मतदारांना नकाराधिकाराची संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान व नकाराधिकाराचा हक्क बजावून केवळ लायक उमेदवारांनाच निवडून द्यावे.’’ वसंत लोढा, ज्येष्ठ नेते, मनसे