आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगखाऊ रुग्णालयांवर कारवाईत वेळकाढूपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील पार्किंग खाऊ १२१ रुग्णालयांना केवळ नोटिसा बजावण्याची कार्यवाही मनपा प्रशासनाने केली. दिखाऊपणा करण्याऐवजी संबंधित रुग्णालयांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनपाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण अतिक्रमण निर्मूलन विभागाने आतापर्यंत तीनवेळा शहरातील १२१ रुग्णालयांना पार्किंग खुले करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. नियमानुसार या रुग्णालयांवर आतापर्यंत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासन केवळ नोटिसा पाठवण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप ब्रिगेडने केला आहे. नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाप्रमाणे या रुग्णालयांचा तळमजला पार्किंगसाठी ठेवण्यात आल्याचे दर्शवण्यात आले आहे.
मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी ओपीडी, रिसेप्शन, वेटिंग, मेडिकल, लिफ्ट, लॅब आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. ही बाब कायदेशीरदृष्ट्या गंभीर असतानाही प्रशासन या बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. माहिती अधिकारात यासंदर्भात मागवलेल्या माहितीतून केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आल्याचे पुढे आले.
केवळ अहवाल मागवल्याचा पत्रव्यवहार आढळून येतो. मात्र, प्रत्यक्षात एकाही रुग्णालयावर कारवाई झालेली नाही. रुग्णालयाकडून पार्किंगसाठीच्या जागेचा गैरवापर झाल्याने शहरात वाहतुकीच्या समस्येत भर पडली अाहे. या समस्येला रुग्णालय चालक प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. अर्थपूर्ण तडजोडी करून प्रशासन कायदेशीर नियम धाब्यावर बसवत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले असून येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, दत्ता साठे, अण्णासाहेब सावंत, गणेश गायकवाड, अफसर शेख, विजय खेडकर, अच्युत गाडे, सुनील इथापे, योगेश शिंदे, सचिन वाघ, नीलेश पोटे, अभिषेक बागडे आदींच्या सह्या आहेत.
डॉक्टरांकडून दबाव
महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई टाळण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी संघटितपणे प्रयत्न चालवले आहेत. दाद मागण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत संपर्क करण्यात आला. डॉक्टरांच्या दबावामुळे मनपा प्रशासन ठोस कारवाई करण्यास मागेपुढे पहात आहे. नोटिसानंतर काही रुग्णालयांनी अनधिकृत बांधकाम हटवून पार्किंगची व्यवस्था केली आहे. उर्वरित रुग्णालयांकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...