आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात आरोपी ‘पप्पू’ही पोलिसांच्या रडारवर, तीन आरोपींना 16 पर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच टेम्पोत मुनोत यांना डांबून ठेवण्यात आले होते. - Divya Marathi
याच टेम्पोत मुनोत यांना डांबून ठेवण्यात आले होते.
नगर - पाइपलाइन रस्त्यावरील सुरेश लालचंद मुनोत यांच्या अपहरणनाट्याला आणखी एक कलाटणी मिळाली. या गुन्ह्यात पांढरी पूल परिसरातील ‘पप्पू’ नावाच्या एका कुख्यात गुंडाचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्यातही पोलिसांना तो हवा आहे. त्यामुळे पोलिस आता पप्पूच्या मागावर आहेत. दरम्यान, अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सादिक शेखसह तिघांना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सुरेश मुनोत यांचे सादिक नवाब शेख (वय ४५, मुकुंदनगर) याने शुक्रवारी रात्री अपहरण केले. मुनोत यांना घेऊन तो पांढरी पूल परिसरात गेला. पांढरी पूल परिसरातील कुख्यात गुंड ‘पप्पू’च्या मदतीने त्याने मुनोत यांना डांबून ठेवले. नंतर सुरेश यांच्या मुलाला फोन करुन ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. सादिक सहकाऱ्यांनी मुनोत यांना बेदम मारहाणही केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या विशेष पथकाने तोफखाना पोलिसांसाेबत मोहीम राबवून मुनोत यांची सुटका केली.

पोलिसांनी पांढरी पुलाशेजारच्या गुंजाळे (ता. राहुरी) गावाजवळच्या जंगलातून सादिक शेख गीताराम रमेश तांबे यांना ताब्यात घेतले. इतर तिघे आरोपी मात्र पसार झाले. मुनोत यांना आरोपींनी एका टाटा एस (छोटा हत्ती) वाहनामध्ये डांबून ठेवले होते. आरोपींनी केलेल्या मारहाणीत मुनोत यांच्या बरगडीचे हाडही फ्रॅक्चर झाले. मुनोत यांचा मुलगा विवेक याने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण, दरोडा, खंडणी, मारहाण करणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.

अारोपींच्या ताब्यातून एक टाटा एस वाहन, ३० हजार रुपयांची रोकड, बांधून ठेवण्यासाठी वापरलेली दोरी असा मुद्देमालही जप्त केला. शनिवारी रात्री उशिरा या गुन्ह्यातील पसार झालेला सागर संजय शिंदे (विळद पिंप्री, नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस नाईक दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर यांनी ही कामगिरी केली. सागरच्या ताब्यातून पोलिसांनी मुनोत यांची अॅक्टिवा दुचाकी जप्त केली. शनिवारी रात्री तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक झाली.

रविवारी सकाळी सादिक शेख, गिताराम तांबे सागर शिंदे यांनी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विकास काळे यांनी आरोपींना गुन्ह्याचा अधिक तपासाकरिता दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने आरोपींना १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात पांढरी पूल परिसरातील ‘पप्पू’ या कुख्यात गुंडाचाही महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
‘पप्पू’ला गुन्हेगारीचा वारसा
अपहरण केल्यानंतर आरोपींनी आपल्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुनोत यांनी पोलिसांना सांगितले. हे पिस्तूल लावणारा ‘पप्पू’च असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पप्पूचे वडील पूर्वाश्रमीचे पोलिसांचे खबरे होते. पांढरी पूल परिसरात ‘पप्पू’ त्याच्या वडिलांनी ढाबा चालवायला घेतला आहे. तेथे जुगार, अवैध वेश्या व्यवसायही चालतो. गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेटही तेथेच कार्यरत आहे. अनेकदा छापे टाकूनही ‘पप्पू’ स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही.

त्यांचा ‘स्वभाव’ही नडला
अपहरण झालेले व्यापारी मुनोत यांच्याविषयी चौकशीत वेगळी माहिती समोर आली आहे. गॅस एजन्सीतील नोकरांवर विसंबून राहणे, नोकरांकरवी आर्थिक व्यवहार करणे, निष्काळजीपणाने मोठी रक्कम बाळगणे अशा सवयी त्यांना असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुनोत यांचा हाच स्वभाव अपहरण नाट्यात त्यांना नडला. सादिकशी त्यांचे काही व्यवहार असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला. मात्र, त्यादृष्टीने अद्याप कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तो आधीपासूनच ‘वाँटेड’
पांढरीपूल परिसरातील कुप्रसिद्ध ‘पप्पू’ पोलिसांना अनेक गुन्ह्यात ‘वाँटेड’ आहे. त्याच्यावर दरोडे, जबरी चोऱ्या, गँगवॉर, आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांत त्याने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा त्याला अटक केली आहे. पण पोलिसांच्या नाकावर िटच्चून त्याची गुन्हेगारी कारकीर्द आणखी बहरत आहे. पांढरी पूल परिसरात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेटही तो चालवतो. यापूर्वी कैक वेळा पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...