आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novality : Vegatables And Medicine Plants On Terrace

नावीन्य : घराच्या गच्चीवर भाजीपाला अन् वनौषधीही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - हिरवाईची आवड असेल, तर कोणतीही अगदी जागेचीही अडचण आडवी येत नाही. पुणे व नाशिकसारख्या मोठय़ा शहरांत नागरिकांनी गच्चीवर बागा फुलवल्या आहेत. नगरमध्येही आता अशा बागा फुलू लागल्या आहेत. पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या नगर शहरात या उपक्रमाला सुरुवात झाली असून हळूहळू अनेक लोक त्याकडे वळत आहेत.

शहरांत इमारतींचे जाळे जसे पसरू लागले, तशी मोकळी जागा कमी होऊ लागली आहे. झाडांची आवड असणार्‍यांनी त्यावरही मार्ग शोधून काढला आहे, तो म्हणजे गच्चीवर बागा फुलवण्याचा. सावेडी भागात शिवाजी काकडे राहतात. किलरेस्कर कंपनीतून गेल्यावर्षी ते निवृत्त झाले. हिरवाईचा छंद होता, पण नोकरीच्या गडबडीत राहून गेला होता. ते राहतात तो फ्लॅट इमारतीत सर्वांत वर आहे. त्यांनी त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. पन्नासेक प्रकारची फुलझाडे व फळझाडे त्यांनी कुंड्यांत लावली आहेत. शिवाय प्लास्टिकच्या क्रेटमधून ते भाजीपाला पिकवतात. उन्हाळ्यातही ही बाग नजरेला शीतलतेचा अनुभव देते.

संपूर्ण काकडे कुटुंबालाच झाडांची आवड आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी गच्चीत बाग लावण्याचे ठरवले. भाजीपाला पिकवण्यासाठी त्यांनी प्लास्टिकचे ट्रे आणले. वांगी, वाल, कारली, भोपळे, मिरच्या, कोथिंबिर, टोमॅटो, काकडी, मेथी, पालक, शेपू आदी भाज्यांचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. स्टँडवर लावलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये झाडे असल्यामुळे गच्ची खराब होत नाही. प्रत्येक झाडाची स्वतंत्रपणे देखभाल करणे त्यांना सहज शक्य होते.

केडगावच्या शाहूनगर वसाहतीत राहणारे अमित शिंदे गेल्या पाच वर्षांपासून गच्चीवर भाजीपाला पिकवतात. वर्षभरासाठी लागणारा लसूण, कांदे याबरोबरच मेथी, पालक, काकडी, वाल, कारल्यासारख्या भाज्याही ते गच्चीवर पिकवतात. शिंदे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांचा दोन गुंठय़ांचा प्लॉट आहे. आपल्या गच्चीवरच्या छोटेखानी ‘शेती’बद्दल बोलताना ते म्हणाले, मला व कुटुंबाला झाडांची आवड आहे. येथे राहायला आल्यावर भराभर झाडे लावत गेलो. हळूहळू घराशेजारची सर्व मोकळी जागा झाडांनी भरून गेली. अजून बरेच काही करायचे होते. आता काय करायचे, अशी चिंता सतावत होती. त्याचवेळी एका मासिकात आलेला लेख वाचून गच्चीवर भाजीपाला लावण्याची प्रेरणा मिळाली. लेखात सांगितल्याप्रमाणे मी तातडीने सर्व सामग्री जमवली. प्लास्टिकचा कागद अंथरून त्यावर मातीचा सुमारे फूटभर थर दिला. पहिल्याच वेळी कांदा पिकवला. शेतात कांदा लावण्याआधी शेतकरी त्याचे रोप तयार करतात. नंतर उपटून त्याची लागवड केली जाते.

शिंदे मात्र मातीत थेट बी लावतात. रोप जरी दाट उगवले, तरी विरळणी करून ती पात भाजीसाठी वापरतात. कांदा, लसूण व भाजीपाल्याबरोबरच दोन वेळेस बटाटाही यशस्वीपणे पिकवला. आता मातीची मशागतच करून ठेवली आहे. लवकरच तेथे कांदा लावणार आहेत. गच्चीवर मोठय़ा प्रमाणात तुळस व गवती चहा लावला आहे. रासायनिक खते किंवा रसायने मारत नाही. तसेच ठिबकने पाणी देत असल्याने कमी पाणी लागते, असे शिंदे म्हणाले.

गोविंदपुर्‍यात राहणार्‍या प्रा. जयर्शी मुळे यांनी गच्चीवर वनौषधींची बाग फुलवली आहे. त्या स्वत: वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी अतिशय दुर्मिळ औषधी वनस्पती मिळवून त्या आपल्या बागेत लावल्या आहेत. सहा वर्षांपासून त्या झाडांचे जतन व संवर्धन करीत आहेत. त्यांच्याकडे सर्पगंधा, माइनमूळ, अनंतमूळ, शतावरी, कपरूर तुळस, ब्राम्ही, अश्वगंधा, रिंगणी, भुईरिंगणी, कुडा, जमालगोटा, सिंदाडमाकड, अक्कलकाढा, समुद्रसोष, कुंभा, रिठा, मालकांगुणी, लेंडी पिंळी,, काडेरिायत, अर्जुन सदडा, अडुळसा, रानजिरा, कोरफड, गुंज, गवती चहा, कमळ, वाळा, वेखंड, कांडवेल, गुग्गुळ, नागवेलीची पाने सदाफुली, गुडमार, दवणा, कोष्टकुशिंजन, रानओवा आदी सुमारे पन्नास प्रकारची झाडे आहेत. नगरमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा वौषधी पाहायच्या असतील, तर प्रा. मुळे यांची बाग पाहण्याशिवाय पर्याय नाही.

ही मजा काही औरच
गच्चीवर दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोपांची वाढ चांगली होते. शिवाय किडीचे प्रमाणही कमी असते. स्वत:च्या हाताने पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खाण्यासारखा दुसरा आनंद नाही. स्वत:चे घर असणार्‍या कोणालाही गच्चीवर अशा प्रकारे रोपांची लागवड करता येऊ शकेल. त्यामुळे भाजीपाल्याबरोबर आनंदही मिळेल.’’ अनित शिंदे, केडगाव

बागेमुळे तापमानात घट
बागेमुळे मन रमते. स्वत:च्या हाताने पिकवलेल्या ताज्या भाज्या उपलब्ध होण्याचा फायदा तर आहेच, पण त्यामुळे घराजवळच्या तापमानातही घट होते. त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास जाणवत नाही. हिरवळीचा आनंद उपभोगता येतो, असे शिवाजी काकडे व प्रा. जयर्शी मुळे यांनी सांगितले. भविष्यात आपली बाग अधिक समृद्ध करणार असल्याचे या दोघांनी सांगितले.