आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळाच्या पाणलाेटात पावसाची तूर्त विश्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस अगोदर मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. मात्र, सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवडाभरात धरणात ८८७ दशलक्ष घनफूट नवीन पाणी येऊ शकले. जिल्ह्यात पावसाने सध्या दडी मारली असून त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. पाऊस लांबल्यास पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

यावर्षी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. तथापि, सुरुवातीला पडलेल्या थोड्या पावसानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. प्रारंभीच्या दोन पावसांनंतर पाणलोट क्षेत्र वगळता मोठा पाऊस झाला नाही. गेल्या आठ-दहा दिवसांत सुरुवातीला रिमझिम पाऊस त्यानंतर वातावरण कोरडे झाले. त्यामुळे पेरण्या झालेल्या पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्यावर्षी याच कालावधीत मुळा धरणात ६५० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा होता. धरणात नवीन पाण्याची आवक होण्यासाठी १२ जुलैपर्यंत वाट पहावी लागली होती. मात्र, यंदा पाणलोट क्षेत्रात सुरुवातीलाच दमदार पावसाचे आगमन झाले. मात्र, पुन्हा खंड पडल्याने मुळा नदी हरिश्चंद्र गडापर्यंतच वाहती झाली. पिंपळगाव खांड धरण पार करून २५ जूनला नवीन पाण्याची आवक सुरू झाली. २४ जूनला कोतूळ परिसरात मुळा नदीचा विसर्ग ८५०० क्युसेक्सपर्यंत पोहोचला होता.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोतूळ परिसरात मुळा नदीच्या पात्रातून सध्या ५६१ क्युसेक्स पाणी वाहते आहे. सुरुवातीला असलेला पाण्याचा वेग कमालीचा घसरला असून परिणामी धरणात नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी झालेल्या दमदार पावसाने अवघ्या पाच दिवसांत धरणात जवळपास ९०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. यातून उपयुक्त पाणीसाठी सव्वा टीएमसीच्या पुढे गेला अाहे.

पावसाचे वातावरण तयार होऊनही पाऊस होत नसल्याने चिंतेचे वातावरण अाहे. सरासरीच्या २० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अकोले तालुक्यात झाली आहे.

- सद्यस्थिती (दलघफूमध्ये)
- एकूणसाठा ५७७७
- मृतसाठा ४५००
- उपयुक्त पाणी १२७७
- उपयुक्त पाण्याची टक्केवारी ५.९३
- नवीन पाणी ८९८
बातम्या आणखी आहेत...