आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शौचालये आता वेबसाइटवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगर शहरात तब्बल अडीच हजार नवीन शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी ४०० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांची छायाचित्रे शासनाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत. उर्वरित शौचालयांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
मनपातर्फे शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात शौचालय नसलेल्या शहरातील कुटुंंबांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात सुमारे २४०० कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना अनुदान देण्यात आले. शासनाकडून बारा हजार मनपाकडून पाच हजार असे सतरा हजार अनुदान आहे. ज्या कुटुंबांकडे शौचालयासाठी जागा उपलब्ध नसेल, अशांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. आयुक्त विलास ढगे यांनी या कामात लक्ष घातले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यांवर कोटी २३ लाखांचे अनुदान जमा झाले आहे. उर्वरित अनुदान तातडीने उपलब्ध करण्यात येणार आहे.

आतापर्यंत ४०० कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. पहिले शौचालय बांधणाऱ्या महिला लाभार्थ्याचा आयुक्त ढगे यांनी स्वत: घरी जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या पहिल्या शौचालयाचे शासनाच्या वेबसाइटवर असलेले छायाचित्र नगर शहरातील आहे. आयुक्त ढगे यांनी स्वत: हे छायाचित्र अपलोड केले होते. त्याचबरोबर महापालिकेच्या संगणक विभागाने पूर्ण झालेल्या ४०० शौचालयांची छायाचित्रेदेखील शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली आहेत. नगर महापालिकेने अत्यंत प्रभावीपणे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली आहे.

नगर शहर होणार हगणदारीमुक्त
शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असला, तरी अनेक कुटुंबांकडे व्यक्तिगत शौचालय नसल्याने शहर स्वच्छतेपासून दूर होते. महापालिकेने शौचालय नसलेली कुटुंबे शोधून त्यांना अनुदान उपलब्ध करून दिले. शहरात तब्बल अडीच हजार लाभार्थी नवीन शौचालय बांधणार आहेत. त्याचा फायदा नगर शहर काही काळातच हगणदारीमुक्त होण्यासाठी होणार आहे.

अनुदानप्राप्त शौचालयांची पाहणी होणार
शासनाकडून मिळालेला अनुदानाचा पहिला हप्ता कोणतीही दिरंगाई करता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. उर्वरित अनुदानही लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अनुदानाचे पैसे इतर कामांसाठी खर्च करता ते शौचालय बांधण्यासाठीच खर्च करणे आवश्यक आहे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. लाभार्थ्याच्या शौचालयांची पाहणी होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.