आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आपली सुरक्षा आपल्याच हाती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - 'आपली सुरक्षा आपल्याच हाती' ही संकल्पना दिल्ली गेट परिसरातील देशमुख गल्लीतील नागरिकांनी सार्थ ठरवली आहे. येथील रहिवाशांनी लोकवर्गणी करून गल्लीत आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे तब्बल चारशे मीटर परिसराला सुरक्षा मिळाली आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांनी आपल्या परिसरात असा उपक्रम राबवला, तर चोऱ्या, घरफोड्या, महिलांची छेडछाड, तसेच चेन स्नॅचिंगसारख्या प्रकारांना नक्कीच आळा बसू शकेल.
शहराला सुरक्षा देण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असले तरी चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळेच पोलिस प्रशासनावर अवलंबून राहता आपली सुरक्षा आपण करण्याचा निर्णय देशमुख गल्लीतील रहिवाशांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी लाेकवर्गणी करून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. प्रत्येकाने जमेल तेवढे पैसे जमा केले. जमवलेल्या २५ हजार रुपयांतून आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. देशमुख गल्ली, विक्रांत चौक, चौपाटी कारंजा, नालेगावकडे जाणारा रस्ता, शमी गणपती चौक असा सुमारे चारशे मीटरचा परिसर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आला आहे.

हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. शाळा-महाविद्यालये, खासगी क्लासेस तसेच विविध बँकांमुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. दुचाकी चोरी, पेट्रोल चोरी, घरफोड्या, चेन स्नॅचिंग असे प्रकार यापूर्वी परिसरात घडले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनावर अवलंबून राहता "आपली सुरक्षा आपल्याच हाती' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला. आता संपूर्ण परिसरातील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याने रहिवासी काहीसे निश्चिंत झाले आहेत.

या गल्लीत राहणारे अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते अविनाश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सर्व कॅमेऱ्यांचे कंट्रोलिंग ठेवण्यात आले आहे. दुर्दैवाने एखादा चोरीसारखा प्रकार घडला तर त्याचे सर्व व्हिडिओ चित्रीकरण कॅमेऱ्यांमध्ये उपलब्ध होईल. त्यातून पोलिसांना तपास करणे सोपे होणार आहे. देशमुख गल्लीतील नागरिकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या परिसरात असेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मोठा हातभार लागेल. हा उपक्रम राबवण्यासाठी योगेश पाठक, राजेंद्र कुलकर्णी, राजेंद्र दळवी, संजय दळवी, ऋषिकेश दळवी, अॅड. राजेंद्र सेलोत, सौरभ देशपांडे, ओंकार दळवी, धनंजय पाठक, श्रेयस लिमये, गौरव राऊत, व्रजेश गुजराथी आदींनी परिश्रम घेतले. परिसरातील व्यावसायिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

अनेक पर्याय उपलब्ध
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अॅनालॉग आयपी असे दोन मुख्य प्रकार आहेत. जेवढा परिसर असेल, त्या प्रमाणात कॅमेऱ्याची लेन्स वापरावी लागते. केवळ कॅमेरे बसवून उपयोग नाही, तर या कॅमेऱ्यांमधील छायाचित्रण स्पष्ट असायला हवे. त्यातील व्यक्ती ओळखता आल्या पाहिजेत. पंधरा ते शंभर मीटरचा परिसर एका कॅमेऱ्यात कैद करता येतो. नागरिकांनी सुरक्षेसाठी असे कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. वैभव चौधरी, संचालक,नेट-टेक सोल्युशन्स.

सुरक्षेचा प्रश्न मिटेल
शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडत आहे. शहरातील अन्य भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यातून पोलिस यंत्रणेवरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल, शिवाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही सुटेल.'' स्वप्निल देवकर, स्थानिक रहिवासी.

पोलिसांवर अवलंबून नको
पोलिस प्रशासनावर शहराच्या सुरक्षेचा आधीच मोठा भार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळेच आम्ही परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोऱ्यांचे प्रकार निश्चितच बंद होतील, असा आम्हाला विश्वास आहे. सतीश गुजराथी, स्थानिक रहिवासी.

सकारात्मक प्रतिसाद
आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना मांडली. त्यास रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोनशेपासून हजार रुपयांपर्यंत ज्याला जेवढी मदत शक्य होईल तेवढी प्रत्येकाने दिली. कॅमेरे बसवल्याने सुरक्षेच्या बाबतीत आम्ही काही प्रमाणात निश्चिंत झालो आहोत. चंद्रकांत कलवडे, स्थानिक रहिवासी.

ही काळाची गरज
चाेऱ्यांचेवाढतेप्रमाण थांबवण्यासाठी नागरी वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखूनच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमच्या परिसरात कॅमेरे बसवले. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे. त्यातून पोलिस प्रशासनावरील कामाचा ताणही थोड्याफार प्रमाणात कमी होईल. अविनाश कुलकर्णी, इंजिनिअर.