आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट पोलिसिंग’द्वारे कायदा सुव्यवस्था सांभाळणार, लवकरच ‘सायबर पोलिस स्टेशन’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सायबर पोलिस स्टेशन, आयएसओ मानांकन प्राप्त उपविभागाीय पोलिस अधिकारी कार्यालये, नागरिकांना उत्तम सेवा देताना गुन्ह्यांचा निपटारा करणारे स्मार्ट पोलिस ठाणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी विविध यंत्रणांचा सहभाग असलेली स्वतंत्र इमारत, अशी नगर पोलिस दलाची नवी आेळख असणार आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र राज्य शासनाच्या अनुदानातून या योजना लवकरच सुरू होत आहेत. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सायबर पोलिस ठाणे प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावे, असे राज्य शासनाचे आदेश आहेत. राज्यातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये असे पोलिस ठाणे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. नगरमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातच असे पोलिस ठाणे सुरू होत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्याचे उद््घाटन होईल. एक पोलिस निरीक्षक, दोन फौजदार, दहा पोलिस कर्मचारी, असे या पोलिस ठाण्याचे संख्याबळ असेल. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास या पोलिस ठाण्यातून वेगाने केला जाईल. 

पुणे गुन्हे अन्वेषण शाखेतून नगर जिल्ह्यात बदलून आलेले पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. सध्या ते इतर जिल्ह्यांचा अभ्यास दौरा करत असून लवकरच नगरचे स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन अस्तित्वात येईल. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नोंदवली जाणारी फिर्याद येथेच नोंदवायची, किंवा संबंधित पोलिस ठाण्यात नोंदवून नंतर त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करायचा, याबद्दल विचारविमर्ष सुरू आहे, असेही पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले. 

स्मार्ट पोलिस ठाणे 
केंद्र शासनाच्या योजनेनुसार राज्यातील दहा पोलिस ठाणे स्मार्ट पोलिस स्टेशन म्हणून गौरवली जाणार आहेत. त्यात नगर पाेलिसही सहभागी होत आहेत. त्यादृष्टीने शनिशिंगणापूर, भिंगार कॅम्प, राहाता, शिर्डी कोपरगाव पोलिस ठाण्यांचा समवेश केला आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये राज्य शासनाची समिती या पाच पोलिस ठाण्यांची पाहणी करेल. राज्यात सर्वाधिक गुण मिळवणारी पहिली १० पोलिस ठाणी या योजनेत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच कसून तयारी सुरू झाली आहे. 

गुणवत्ता, दर्जा सुधारणार 
स्मार्टपोलिस ठाण्याच्या स्पर्धेत असलेल्या पोलिस ठाण्यांना गुण मिळणार आहेत. एखादा गुन्हा नोंदवला गेला, तर दाेन गुण कमी होतील. एखाद्या गुन्ह्याचा शोध लावला तर दोन गुण मिळतील. याशिवाय संपूर्ण संगणकीय कामकाज, स्वच्छता, मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट, उत्कृष्ट कामकाज, सर्वसामान्यांना मिळणारी चांगली वागणूक, यांसह इतर मुद्द्यांवरही गुण दिले जाणार आहेत. सर्वाधिक गुण असलेले राज्यातील दहा पोलिस ठाणे केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट केली जातील. 

आयएसओ मानांकन 
जिल्ह्यात एकूण आठ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नगर ग्रामीण शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर इतर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, त्यापाठोपाठ जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी या योजनेत समाविष्ट केली जातील. पोलिस दलाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना अवलंबली जात आहे, असे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले. 

महिला संरक्षण कक्ष 
नागपूरपोलिस दलाच्या धर्तीवर नगरमध्येही महिला कक्षाला बळकटी देण्याचा पोलिस अधीक्षक शर्मा यांचा मानस आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेचे अनुदान मिळणार आहे. कौटुंबिक समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना एकाच इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या यंत्रणा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने ही इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये सरंक्षण अधिकारी, कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत, मानसशास्त्रीय समुपदेशन, पोलिसांची मदत, अत्यावश्यक सेवा असलेला निवारा कक्ष, यांचा समावेश असेल. 

इतर यंत्रणांचीही मदत 
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना महिला बालविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. कौटुंबिक छळविरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या योजनेचे अनुदान घेतले जाईल. त्यातूनच अत्याचार पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत करण्याचा मानस आहे. एकूणच नगर पोलिस दलाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले आहे. 

पोलिसांची प्रतिमा उंचावणार 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे, तसेच कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम केले जाईल. जिल्ह्यात महिला सुरक्षेला प्राधान्य देऊन कौटुंबीक समस्या सोडवण्याचेही काम केले जाणार आहे. त्यासाठीच महिला कक्षामध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. “स्मार्ट पोलिसिंग’च्या आधारे पोलिस दलाची प्रतिमाही उंचावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
- रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक. 
बातम्या आणखी आहेत...