आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिणी बरसल्याने पेरणीचे वेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात सर्वदूर रोहिणीच्या सरी बरसल्याने खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे. दुष्काळाने जेरीस आलेल्या शेतकर्‍यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील दोन वर्षांपासून कमी पावसामुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाच्या तप्त झळांमुळे भेगाळलेल्या शेतात बसून आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. आठ दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी व्हायची, काही थेंब अंगावर पडायचे, मात्र, रोहिणी बरसत नव्हत्या. शनिवारी रात्री ही प्रतीक्षा संपली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक 31 मिलिमीटर पाऊस कर्जतमध्ये झाला. त्याखालोखाल श्रीगोंदा, नगर व पारनेर तालुक्यात पाऊस झाला. मात्र, कोपरगाव, राहाता, राहुरी तालुक्यांत थेंबही पडला नाही. ज्या भागात रोहिणी बरसली, तेथील शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांत नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यांत खरिपाच्या पेरणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी सुमारे तासभर पाऊस झाला. या पावसामुळे फळबागांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: डाळिंबाच्या बागांना जीवदान मिळाले आहे. उघड्यावर कांदा साठवणार्‍यांचे मात्र पावसामुळे नुकसान झाले.

रविवारी अर्धा तास सुरू झालेल्या पावसामुळे संगमनेरकरांना दिलासा मिळाला. पहिल्याच पावसाने रस्त्यावर मात्र सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. जोरदार वार्‍यामुळे पंधरा-वीस मिनिटांतच पावसाने आटोपते घेतले. मात्र, एवढय़ा वेळेत रस्त्यावर सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे संगमनेरकरांचे हाल झाले. पाण्यातून मार्ग काढताना संगमनेरकरांची दमछाक होत होती.

उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना शनिवारी पावसाने दिलासा दिला. लहानग्यांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होऊन काही भागात वाहतूक कोंडी झाली होती. पावसाला सुरूवात होताच केडगाव परिसरातील वीज गायब झाली. रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. नगर शहरात रविवारी मात्र पावसाने विर्शांती घेतली. उष्माही काहीसा वाढला होता.


तालुकानिहाय पाऊस
* कर्जत 31
* श्रीगोंदा 23
* नगर 14
* पारनेर 15
* पाथर्डी 06
* शेवगाव 03
* श्रीरामपूर 03
* नेवासा 02