आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅन्टी ह्युमन ट्राफिकिंग सेलला आता बळकटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हरवलेल्या बालकांसाठी जानेवारी महिन्यात "ऑपरेशन स्माईल' दोन ही शोधमोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयानेच ही मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे हरवलेल्या सापडलेल्या बालकांबाबत त्यांच्या पुनर्वसनाबाबत संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेनिमित्त प्रथमच जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी पुढाकार घेत गुन्हे शाखे अंतर्गत असलेल्या "अॅन्टी ह्युमन ट्राफिकिंग सेल'ला बळकटी दिली आहे. या सेलला सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पोलिस मुख्यालयात पोलिस अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील ३० पोलिस ठाण्यांचे २१ अधिकारी ४१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षातर्फे ही बैठक घेण्यात केली. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे यांनी www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळावर हरवलेल्या सापडलेल्या बालकांची माहिती अद्ययावत करण्याचे प्रशिक्षण दिले. पोलिस कर्मचाऱ्यांना संबंधित ठाण्यातील युजर आयडी पासवर्डची माहिती दिली. बालकांबाबत काम करणाऱ्या शासकीय निमशासकीय यंत्रणांचे माहितीपत्रक देऊन ते पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावले.

बाल न्याय अधिनियम २०००(२००६) अंतर्गत हरवलेल्या सापडलेल्या बालकांबाबत, त्यांच्या पुनर्वसनाबाबत बाल कल्याण समितीची संपूर्ण प्रक्रिया डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी पोलिसांना दिली. तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे शंका निरसन केले. परिवीक्षा अधिकारी अलका निसळ यांनी महिला बालविकास विभागाअंतर्गत अत्याचार ग्रस्त बालकांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेबद्दल सांगितले. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राजकुमार हिंगोले उपनिरीक्षक संदीप शिंदे, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलिस बाबासाहेब इखे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले. जिल्हा बाल सरंक्षण कक्षाचे अधिकारी अर्जुन दळवी, महेंद्र पांढरे, गणेश ताठे हेही यामध्ये प्रयत्नशील होते.

मिळाले नवे अधिकारी
हरवलेल्या,अपहृत बालकांच्या शोधासाठी किंवा सापडलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आहे. काही महिन्यांपासून या कक्षात तीनच कर्मचारी होते. ही बाब "ऑपरेशन स्माइल'च्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या लक्षात आली. आता दहशतवाद विरोधी सेलचे पोलिस निरीक्षक अजित लकडे मोबाइल सेलचे सहायक निरीक्षक अनिल बेहराणी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचा पदभार सोपवण्यात आला आहे. पण या सेलमध्ये सध्या एकच पोलिस कर्मचारी आहे इतर दोन कर्मचारी इतरत्र कार्यरत करण्यात आले आहेत

सात दिवसांत यश
"ऑपरेशन स्माईल' अंतर्गत जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लोहमार्ग पोलिस ठाण्याने दोन सापडलेल्या बालकांचे पुनर्वसन केले. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एस. मोरे, शिपाई यु. एल. कोंगे, ए. ए. टिंगरे महिला शिपाई व्ही. बी. समिंदर यांनी ही कामगिरी केली. १२ वर्षांची दोन बालके रेल्वे स्टेशन परिसरात चुकून गेली होती. गस्तीवरच्या पोलिसांनी त्यांना पाहिले. बालकांना घराचा पत्ता सांगता येत नव्हता. पोलिस त्यांना शहरात घेऊन फिरोदिया शाळेपर्यंत आले. तेव्हा बालकांनी यतीमखान्यात रहात असल्याचे सांगितले. नंतर कायदेशीर सोपस्कार आटोपून ही मुले विश्वस्तांच्या ताब्यात सोपवण्यात आली.

१८५ बालकांचे झाले पुनर्वसन
सन २०१५ या वर्षभरात बालकांच्या अपहरणाचे १९८ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले. त्यामध्ये एकूण २१७ बालकांचे अपहरण झाल्याचे समोर आले. त्यापैकी १८५ बालकांना शोधून पुन्हा पालकांच्या हवाली करण्यात आले. संबंधित पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेचा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. तर यंदा जानेवारी महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र ऑपरेशन स्माइल राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत अवघ्या दहा दिवसांमध्ये बालक, मुली, ११ पुरुष १४ स्त्रियांना शोधून काढण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकत्रित आल्या.