आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिवासी नगरकरांचे देशनिर्माणातील योगदान सर्वांसाठी प्रेरक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरात जन्मलेले, वास्तव्यास असलेले अनेकजण परदेशांत स्थायिक झाले असले, तरी मातृभूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते मौलिक योगदान देत आहेत. अमेरिकेतील संगीता आणि सचिन राजे या दाम्पत्याने मागील 8 वर्षांत स्नेहालयसह विविध सामाजिक संस्थांना याच भूमिकेतून दिलेले सातत्यपूर्ण योगदान प्रेरक व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन महापौर संग्राम जगताप यांनी केले.

नगरमधील स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गरुड यांचे चिरंजीव गोपाळ गरूड यांनी 1971 च्या भारत - पाकिस्तान युद्धात लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोपाळ गरूड यांची कन्या संगीता राजे अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांचे पती सचिन राजे हे संगणक तज्ज्ञ असून भारतीय चित्रपट संगीताचा त्यांचा गाढा व्यासंग आहे. अनेक प्रख्यात गायकांच्या गाण्यांचे कार्यक्रम ते अमेरिकेत करत असतात. या दाम्पत्याने मागील 8 वर्षांत अमेरिकेमध्ये दिल आज शायर है, एकसे बढकर एक असे अनेक संगीताचे कार्यक्रम आयोजित करून स्नेहालय व अन्य सामाजिक संस्थांसाठी निधी संकलन केले. त्यांचा मुलगा जय देखील निधी संकलनात सहभागी असतो. संगीता आणि जय यांचा महापौर जगताप यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
स्नेहांकुरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास डॉ. गिरीश कुलकर्णी, गुगल कंपनीचे भारतातील प्रमुख आरिजित सरकेर आणि रिटेल वेअर कंपनीचे प्रमुख अजित थदाणी उपस्थित होते.
अनिवासी नगरकर देशासाठी करीत असलेल्या योगदानाची दखल घेऊन अशा अनिवासी नगरकरांचे संमेलन महापालिकेने नगर येथे आयोजित करावे, तसेच नगरविकासात त्यांचा सहभाग मिळवावा, अशी सूचना यावेळी डॉ. प्रीती भोंबे यांनी नगरकरांतर्फे केली. महापौरांनी त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बाळासाहेब वारुळे यांनी आभार मानले.

नगरचा सदैव अभिमान...
भारतमातेने प्रत्येकाला एवढे उपकृत केले आहे की, कितीही उतराई व्हायचा प्रयत्न केला, तरी पूर्ण ऋणमुक्त कोणीही होऊ शकणार नाही. आपली कुवत एकवटून मायभूमीसाठी काही करण्याची धडपड आपले आयुष्य अर्थपूर्ण करते, असे संगीता राजे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले. आपली पाळेमुळे नगरमध्ये आहेत, याचा आपल्याला नेहमी अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.